गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंह आणि सचिन वाझे या दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्रामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. राज्य सरकारच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. काही मंत्र्यांनी राजीनामे दिले देखील असून अजून काही मंत्री राजीनामे देतील, असे दावे भाजपाकडून केल जात आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरच्या मंगळवेढ्यामध्ये प्रचारसभेत बोलताना सूचक विधान केलं आहे. “लोकं मला विचारतात एका मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे काय फरक पडणार आहे? याने काय सरकार बदलणार आहे का? मी म्हणतो सरकार कधी बदलायचंय ते माझ्यावर सोडा. ते बदलू आपण. पण या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढ्याच्या मतदारांना मिळाली आहे”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

पंढरपूरमध्ये लागलेल्या पोटनिवडणुकीसाठी सध्या प्रचार सुरू असून सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांकडून देखील प्रचारसभा घेतल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या सभेत करोना नियमांची पायमल्ली झाल्याचा मुद्दा देखील चर्चेत आला होता. त्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचच लक्ष सध्या पंढरपूरच्या पोटनिवडणुकीकडे आणि त्यासाठीच्या प्रचारसभांकडे लागलं आहे.

लॉकडाउनवरुन फडणवीसांची ठाकरे सरकारवर जोरदार टीका; म्हणाले…

“गांधीदर्शन झालं, तरच न्याय”

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली. “मुंबईत जे घडलं ते भयानक आहे. पोलिसांनाच जर हफ्तेवसुलीसाठी नेमून दिलं जात असेल, तर तो गोरगरीबांना त्रास देतोय आणि त्याच्या खिशातून पैसा काढतोय. यांच्या वसुलीमुळे सामान्य माणूस पोलीस स्टेशनला गेला तर त्याला न्याय मिळत नाही. गांधीदर्शन असेल तरच न्याय मिळतो”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

 

“सर्व मंत्री आत्ममग्न झालेत”

दरम्यान, राज्यातील करोनाच्या परिस्थितीवरून देखील फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला. “राज्यात सरकार आहे की नाही, अशी अवस्था पाहायला मिळतेय. सर्व क्षेत्रात अडचणी आहेत. सरकारचं अस्तित्व मात्र दिसत नाही. सगळे मंत्री आत्ममग्न झालेत. आपल्यापलीकडे सरकार काही पाहू शकत नाहीये. सामान्य माणूस मेला की जगला, याचं सरकारला घेणंदेणं नाहीये. करोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. सर्वात जास्त करोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. पण राज्य सरकार त्यांना बेड, रेमडेसिवीर, ऑक्सिजन देऊ शकत नाहीये. हे खरं आहे की राष्ट्रवादीचे काही नेते रेमडेसिवीर वाटत आहेत. त्यांनी त्यांच्याकडे स्टॉक करून ठेवलाय का ते माहीत नाही. पण सामान्य माणसाला मात्र मेला तरी रेमडेसिवीर मिळत नाही अशी अवस्था सरकारने आणून ठेवली आहे”, असं फडणवीस म्हणाले.

Story img Loader