धनुष्यबाण हे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवल्यानंतर त्यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. या सगळ्यामागे भाजपा असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून आणि शिंदेगटाकडूनही शिवसेनेला लक्ष्य केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेमध्ये मोदींविषयी केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी देवेंद्र फडणवीसांना विचारणा केली असता त्यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरेंनी रविवारी दुपारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना ‘नरेंद्र मोदी घासलं गेलेलं नाणं आहेत’ असा उल्लेख केल्याची चर्चा आहे. यावरून भाजपाकडून आक्षेप नोंदवण्यात येत असून खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून उद्धव ठाकरेंना खोचक शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे.

विश्लेषण : शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ चिन्ह निवडणूक आयोगानं का गोठवलं?

“बाळासाहेब नेहमीच श्रद्धेय राहतील, पण..”

उद्धन ठाकरेंच्या विधानाविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत प्रतिक्रिया दिली आहे. “बहुतेक उद्धव ठाकरे हे विसरलेत की नोटबंदीनंतरच्या सगळ्या निवडणुका ते मोदींच्या नाण्यावरच जिंकले आहेत. त्यांचे १८ खासदार आणि ५६ आमदार मोदीजींचं नाणं दाखवूनच निवडून आले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच श्रद्धेय राहतील, पण देशात मोदींचं नाणं चालतच राहील”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“संहितेमध्ये मुख्य नेता असं पदच नाहीये, मग..”, शिवसेनेनं ‘या’ मुद्द्यावर ठेवलं बोट; एकनाथ शिंदेंवर टीकास्र!

“चिन्ह गोठवलं यात काहीही आश्चर्य नाही”

निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचे अंतरिम आदेश दिले, यात आपल्याला काहीही आश्चर्य वाटलं नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. “याआधी गेल्या २५ वर्षांमध्ये कोणत्याही राज्यात एखाद्या पक्षात फूट पडली आणि निवडणूक आयोगासमोर ते प्रकरण गेलं तेव्हा निवडणूक आयोगानं अंतरिम आदेश देत चिन्ह आणि पक्षाचं नाव गोठवलं आहे. त्यानंतर त्यावर सुनावणी घेऊन कायद्यानुसार ज्याचा हक्क असतो, त्याला ते मिळतं.आपल्याकडे निवडणूक आल्यामुळे ते करणं गरजेचं होतं. मला अपेक्षा आहे की जेव्हा निवडणूक आयोग अंतिम निर्णय देईल, तेव्हा एकनाथ शिंदेंची बाजू वरचढ ठरेल”, असं ते म्हणाले.

या घडामोडींमागे भाजपा?

दरम्यान, राज्यात घडत असलेल्या या सगळ्या घडामोडींमागे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात येत आहे. शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी तसा थेट आरोपच केला आहे. यासंदर्भात विचारणा केली असता फडणवीसांनी त्यावर टोला लगावला. “बोलायला आपण काहीही बोलू शकतो. एका चॅनलवर कुणीतरी म्हटलं की शिवसेनेनं सांगितलेल्या नव्या नावांच्या मागे शरद पवार आहेत. ज्याला जे वाटतं ते तो सांगतो”, फडणवीस म्हणाले.

Video : “हम बेवफा हरगिज न थे, पर हम वफा..”, गाण्याचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा भाजपावर खोचक टोला!

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर टिप्पणी

उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरील संवादामध्ये ‘ही शेवटची निवडणूक असल्याप्रमाणे लढा’ असं आवाहन केल्याचं सांगितलं जात आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मागच्या वेळी मी म्हटलं होतं की प्रत्येक निवडणूक शेवटची म्हणून लढा, तेव्हा त्यांना त्याचं फारच वाईट वाटलं होतं. त्यांनी माझीच शेवटची निवडणूक ठरवली होती. मी त्यावर काहीही प्रतिक्रिया देणार नाही. ज्याला जशी निवडणूक लढायची, तशी लढवा”!