महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच तापला असून थेट दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाही या वादाचे पडसाद उमटताना दिसत आहे. कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करण्यात आल्याने राज्यातील नेते संताप व्यक्त करत असून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी तर कर्नाटकमधील जनतेला तुमचा रस्ता कोल्हापुरातून जातो याची आठवण करत इशारा दिला आहे. ‘एबीपी माझा’शी बोलताना त्यांनी यावर तोडगा निघाला पाहिजे असं मतही मांडलं आहे.
“मी कोल्हापुरात स्थायिक असून माझ्यापासून १० किमी अंतरावर कर्नाटक हद्द सुरु होते. गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद सुरु आहे. पण काल महाराष्ट्रातील वाहनांवर झालेल्या दगडफेकीचा मी जाहीर निषेध करतो. हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. पण असं असताना रस्त्यांवरची अशी दादागिरी, गुंडगिरी करणं हे त्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नागरिकांना शोभत नाही,” असा संताप धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे.
“तुम्ही कर्नाटकात आमच्या वाहनांवर हल्ले करत आहात, पण तुम्हालाही देशभरात कुठेही जायचं असेल तर महाराष्ट्रातूनच जावं लागतं हे लक्षात ठेवावं. कोल्हापूर, सोलापूर कुठेही जायचं असेल तर त्यांच्या वाहनांना महाराष्ट्रातून जावं लागतं याची जाणीव त्यांना असली पाहिजे. असे हल्ले होत असतील तर महाराष्ट्र शांत बसणार नाही. यावर तोडगा निघाला पाहिजे,” असंही ते म्हणाले आहेत.
आमच्या संयमाचा अंत पाहू नका: शरद पवार
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची सीमा प्रश्नाबाबतची विविध विधाने देशाचे ऐक्य धोक्यात आणणारी आहेत. त्यातून काही अघटित घडल्यास त्यास बोम्मई जबाबदार असतील. येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबले पाहिजेत. आम्ही संयम राखतो. पण, आमचाही संयम सुटू शकतो, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. ‘अरे’ला ‘कारे’ हे उत्तर द्यायची हिंमत महाराष्ट्र सरकारने दाखवावी, असे नमूद करत अजित पवार यांनी मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याची तारीख जाहीर करण्याची मागणी केली.
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की “सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित असताना हे प्रकार घडणे चुकीचे आहे. देशात संविधानाने कोणालाही कुठेही जाण्याचा, राहण्याचा आणि व्यवसाय करण्याचा अधिकार दिला आहे. कोणतेही राज्य कोणालाही रोखू शकत नाही. संविधानातील तरतुदींचे पालन राज्य सरकार करीत नसेल, तर आम्हाला केंद्राकडे जावे लागेल. याबाबत मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे”.
मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा, लवकरच भेट
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला हिंसक वळण लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात मंगळवारी रात्री दूरध्वनीद्वारे चर्चा झाली. दोन्ही राज्यांमध्ये शांतता राखण्याबाबत त्यांच्यात मतैक्य झाले. ट्रकवरील हल्ल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन बोम्मई यांनी दिले आहे. शिंदे आणि बोम्मई यांची लवकरच भेट होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.