सौरभ कुलश्रेष्ठ

आतापर्यंत पक्षात घेतलेल्या कोणाचीही कसलीही चौकशी सुरू नाही. केवळ स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांनाच भाजपमध्ये प्रवेश आहे. तात्कालिक राजकीय सोय म्हणून नव्हे, तर पुढील १५-२० वर्षांचा विचार करून आणि विशिष्ट लक्ष्य समोर ठेवून इतर पक्षांच्या आमदार- नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देत आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत केले. मात्र ‘लक्ष्य’ कोणते या प्रश्नावर नेहमीच्या शैलीत स्मित करत मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगले.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाजनादेश यात्रेवर निघालेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोंदिया-गडचिरोली प्रवासात भाजपच्या राजकारणापासून, युती, पाच वर्षांतील कारभार आदी विषयांवर सविस्तर भाष्य केले.

* भाजप सरकारने पाच वर्षांत त्यापूर्वीच्या १५ वर्षांत झाली नाही इतकी कामे केली, असे तुम्ही म्हणता. मग इतर पक्षांतून नेते आयात करण्याची गरज का पडते? शिवाय चौकशा लावून ही आयात होते, असा आरोप होत आहे.

– केवळ तात्कालिक राजकीय सोय म्हणून आम्ही इतर पक्षांतील आमदार-नेत्यांना पक्षांत घेतलेले नाही, तर पुढील १५-२० वर्षांचा विचार त्यामागे आहे. भाजपच्या लक्ष्यपूर्तीसाठी विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. जिंकून येण्याची क्षमता आणि स्वच्छ प्रतिमा या निकषांवर आम्ही इतर पक्षांतील आमदार-नेत्यांना पक्षात घेत आहोत. या नेत्यांमुळे राजकीय स्थर्यही येईल. महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांची किंवा आमदारांची कसलीही चौकशी सुरू नाही. केवळ ‘स्वच्छ’ नेत्यांनाच भाजपमध्ये प्रवेश आहे.

* भाजपचे ते लक्ष्य नेमके काय आहे?

– (स्मितहास्य करत) भारतमाता की जय!

* पण या आयात केलेल्या नेत्यांमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही का?

– विधानसभा निवडणुकीतील ९५ टक्के उमेदवारी भाजपच्या कार्यकर्त्यांना मिळेल.

* ‘ईडी’चा वापर करून भाजप फोडाफोडीचे राजकारण करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार करत आहेत..

– शरद पवार यांनी संपूर्ण राजकीय जीवनात फोडाफोडीचे राजकारण केले. कालचक्र आता उलटे फिरत आहे. लोक त्यांना सोडून चालले आहेत. पवार यांना असे वाटते की, ते ज्या पद्धतीने माणसे फोडत होते, त्याच पद्धतीने आम्हीही अवलंबत आहोत. मात्र भाजपला कोणाच्या मागे लागण्याची गरज उरली नाही. लोकच भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. दुसरे म्हणजे राष्ट्रवादी हा संपूर्ण पक्ष भ्रष्टाचाऱ्यांचा आहे असे पवारांना सुचवायचे आहे का? जो स्वच्छ असेल त्याला ‘ईडी’ची कसली भीती?

* तुम्ही राष्ट्रवादी आणि पवारांचे राजकारण संपवत आहात असे बोलले जाते?

– मी कोणाचेही राजकारण संपवण्याचा प्रश्न नाही. शरद पवार यांना वाटेल तितके दिवस ते राजकारणात राहतील. तो त्यांचा अधिकार आहे. कोणाला राजकारणात ठेवायचे – कोणाला निवृत्त करायचे, याचा जनादेश मतदार देतात.

* मुख्यमंत्रिपद, समान जागावाटप या संदर्भातील विविध विधानांमुळे युतीचे नेमके काय ठरले आहे याबाबत संभ्रम निर्माण होत नाही का?

– कोणी काहीही बोलत असले तरी अशा विधानांमुळे काही फरक पडत नाही. पूर्वी युती होणार नाही असे सूर निघत असताना मी ठामपणे युती होणारच, असे सांगत होतो. तसेच झाले. आताही युतीबाबत काय ते माझे आणि उद्धव ठाकरे यांचे बोलणे झाले आहे. योग्य वेळी त्याची माहिती जाहीर करण्यात येईल. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि शिवसेना नेते म्हणून आदित्य ठाकरे यांनाही त्यातील काही गोष्टी माहिती आहेत.

* राज्यात तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यावर सरकार काय करत आहे?

– देशाची रोजगाराची आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर केली त्यात महाराष्ट्राचा वाटा २५ टक्के आहे. उद्योग व सेवा क्षेत्राची सांगड घालून आम्ही रोजगारनिर्मिती करण्यासाठी काम करत आहोत. पायाभूत सुविधांच्या विकासाच्या माध्यमातून ते होईल.

* पाच वर्षांतील मनाला समाधान देणारे काम कोणते?

मुख्यमंत्री फडणवीस – लोकसहभागातून जलयुक्त शिवार हे महत्त्वाचे काम आहे. कारण लोकसहभागातून काय होऊ शकते हे राज्याला कळले आणि सरकार कसे काम करू शकते, हे लोकांना समजले.

पवारांचा डाव त्यांच्यावरच उलटला!

मराठा समाज शांतपणे आणि प्रामाणिकपणे आरक्षणासाठी आंदोलन करत असताना आंदोलन हिंसक व्हावे असे प्रयत्न करण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खुद्द शरद पवार आरक्षणाच्या मंचावर कोल्हापुरात आले. मराठा समाजाच्या आकांक्षेला मी सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरे गेलो. घटनेच्या चौकटीत बसेल असे आरक्षण मराठा समाजाला दिले. आज मराठा समाजातीलच अनेक मोठे नेते भाजपमध्ये येत आहेत. पवार यांनी प्रामाणिक आंदोलकांच्या खांद्यावरून आमच्यावर नेम धरला, पण पवार यांचा डाव त्यांच्यावरच उलटला आहे. शिवाय केवळ जातीच्या आधारावर महाराष्ट्राचे राजकारण चालणार नाही, हेही यातून स्पष्ट झाले आहे, असे शरसंधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवार यांच्यावर केले.

Story img Loader