वेध विधानसभेचा

रवींद्र जुनारकर, गडचिरोली</strong>

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे भाजप उत्साहात आहे, तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील कलहाने ग्रासली असून पराभवाच्या धक्क्यातून अद्याप सावरलेली नाही. शिवसेना चाचपडत आहे तर वंचित बहुजन आघाडीचा जम बसलेला नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस आघाडी अशा सरळ लढतीत भाजपचे पारडे जड दिसत आहे. तरीही पक्षांतर्गत कलहामुळे भाजपची चिंता वाढली आहे.

कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्हय़ात आज स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तर ग्राम पंचायत, नगर पंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद असे सर्वत्र भाजपचे वर्चस्व आहे किंबहुना हा जिल्हा आता भाजपचा गड झालेला आहे. गडचिरोली, अहेरी व आरमोरी असे एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. या तिन्ही विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व अनुक्रमे आमदार डॉ. देवराव होळी, राजे अंबरीश आत्राम व कृष्णा गजबे करत आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तिघेही विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री अंबरीश आत्राम यांचा अहेरी विधानसभा मतदारसंघ सोडला तर भाजपचे खासदार अशोक नेते यांना गडचिरोली व आरमोरी क्षेत्रातून मोठी आघाडी मिळाली. त्यामुळे तसे बघितले तर येथे भाजपला आव्हान देईल, अशी स्थिती सध्यातरी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात दिसत नाही. उद्योगविरहित गडचिरोली जिल्हय़ाला नक्षलवादासोबत वाढती बेरोजगारी अशा विविध समस्यांनी घेरले आहे. ओबीसींचा नोकरीतील आरक्षणाचा विषय गाजतो आहे. मात्र विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला यापैकी एकही मुद्दा लावून धरता आला नाही. किंबहुना लोकांपर्यंत पोहचण्यासाठी तसे आंदोलनही छेडता आले नाही. गटबाजीमुळे या जिल्हय़ात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला आहे. एकीकडे विधानसभेच्या उमेदवारीसाठी भाजपकडे उमेदवारांची रांग लागली आहे, तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाजप उमेदवारासमोर आव्हान उभे करेल, असा उमेदवार शोधावा लागतो आहे.

भाजपला गटबाजीची भीती आहे. त्याला कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार अशोक नेते यांच्या विरोधात भाजपमध्ये सारे आलबेल नव्हते. काही जणांनी विरोधात काम केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे नेते यांचा विरोध असला तरी गडचिरोली विधानसभामधून पुन्हा एकदा विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी हेच भाजपचे उमेदवार राहण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसकडून डॉ. नितीन कोडवते, डॉ. नामदेव होळी, माजी मंत्री तथा माजी खासदार मारोतराव कोवासे यांचे सुपुत्र विश्वजीत कोवासे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र येथे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मर्जीतील उमेदवार राहील हे जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे काँग्रेस कुणाला उमेदवारी देतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. गडचिरोली जिल्हय़ातून दारूबंदी हटवण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. होळी यांनी केली आहे. सध्या गडचिरोलीत दारूबंदीचा विषय मुक्तिपथच्या माध्यमातून लावून धरण्यात आल्याने डॉ. होळी यांच्या विरोधात वातावरण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. दोन लोकसभा व विधानसभा अशा सातत्याने निवडणूक हरणारे जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी व आनंदराव गेडाम यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये अशी मागणी काँग्रेसच्या एका गटाकडून होत आहे. त्यामुळे डॉ. उसेंडी व गेडाम यांचा पत्ता कट होणार, असेही बोलले जात आहे. आरमोरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांच्या विरोधात काँग्रेसकडून माजी आमदार आनंदराव गेडाम, वामनराव सावसाकडे उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या जयश्री वेळदा यादेखील येथून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. दरम्यान, युतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाटय़ाला गेली तर येथून सेनेकडून डॉ. रामकृष्ण मडावी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक चर्चेत असलेल्या अहेरी विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री तथा आमदार अंबरीशराव आत्राम यांना भाजप उमेदवारी देणार की नाही, यावर बरीच चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण अहेरी या एकमेव विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीत भाजप साडेसात हजारांपेक्षा अधिक मतांनी पिछाडीवर राहिला. मात्र, अशाही कठीण परिस्थितीत सूत्राच्या माहितीनुसार अंबरिश आत्राम हेच येथून भाजपचे उमेदवार राहणार आहेत.

भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून अंबरिश यांचे काका माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम तथा आदिवासी विद्यार्थी सेनेचे नेते माजी आमदार दीपक आत्राम प्रयत्नरत आहेत. मात्र, भाजपकडून या दोघांनाही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे धर्मराव राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता अधिक आहे. येथे अंबरिश आत्राम विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडून धर्मरावबाबा आत्राम व अपक्ष दीपक आत्राम अशा लढतीची शक्यता आहे. संघातून भाजपात आलेले स्वयंसेवक संदीप कोरेत यांच्या नावाचीही चर्चा आहे.

‘वंचित’ प्रभावहिन

वंचित बहुजन आघाडी, शेतकरी कामगार पक्ष, बसपा, शिवसेना, मनसे या पक्षांची शक्ती या जिल्हय़ात कमी आहे. वंचितचे उमेदवार डॉ. रमेश गजबे यांना लोकसभा निवडणुकीत एक लाखांपेक्षा अधिक मते मिळाली असली तरी त्यातील बहुसंख्य मते ही चिमूर क्षेत्रातून माना समाजाची मिळाली होती. त्यामुळे वंचित फॅक्टर येथे यशस्वी होईल, असे चित्र सध्यातरी नाही.

पक्षीय बलाबल

गडचिरोली – भाजप

आरमोरी  – भाजप

अहेरी-  भाजप

Story img Loader