महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजपा आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. तीनही पक्षात चांगला संवाद असल्याचं सतत बोललं जातं. पण, तीनही पक्षांमध्ये सारं काही अलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात कायम असते. शिवसेना ( शिंदे गट ), भाजपा आणि राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) यांच्यात २०२४ साली होणाऱ्या लोकसभेच्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. भाजपा २६, तर शिवसेना ( शिंदे गट ) आणि राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) २२ जागा लढविणार आहेत,” अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या मुलाखतीत दिली आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. २०१९ साली लोकसभा निवडणुकीला भाजपाने २५ आणि शिवसेनेनं २३ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यात भाजपाला २३, तर शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या.

हेही वाचा : भाजपाकडून ६-७ दिग्गज आमदारांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची चर्चा, ठाकरे गटाचे खासदार म्हणाले…

“नागपूरमधूनच निवडणूक लढवणार”

“एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार काम करत आहे. नेतृत्वात बदल होणारे वृत्त खोटे आहे. तसेच, मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. नागपूर येथील पारंपारिक विधानसभा मतदारसंघ निवडणुकीला उभे राहणार,” असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.

“निवडून आलेल्या खासदारांना उमेदवारी देणं परंपरा, पण…”

“महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा सर्व्हे करण्यात आला आहे. आमच्याकडे विजयी होणाऱ्या उमेदवारांची माहिती प्राप्त झाली आहे. २०१९ साली निवडून आलेल्या खासदारांना पुन्हा उमेदवारी देणं ही परंपरा आहे. पण, हा अंतिम शब्द नाही. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी विविध स्तरांवर चर्चा केली जाईल,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

“…हाच नियम शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांबाबतही लागू होईल”

“नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात होईल. अधिवेशनानंतर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघनिहाय बैठका घेण्याचा आमचा विचार आहे. एखाद्या ठिकाणी भाजपाचा उमेदवार निवडणूक लढत असेल, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांचा उमेदवार असल्यासारखं प्रचार करतील. हाच नियम शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांबाबतही लागू होईल,” असं फडणवीसांनी म्हटलं.

हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेची निवडणूक महायुतीत लढणार? अजित पवार म्हणाले…

“देशातील जनता पंतप्रधान मोदींच्या पाठिशी”

“लोकसभा निवडणुकीत महायुती ४० ते ४२ जागांवर विजयी होईल. देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी आहे,” असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp fight 26 loksabha seats in maharashtra sena ncp 22 together say devendra fadnavis ssa