बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही तोच पॅटर्न राबवून शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करावे, यासाठी शिवसेनेकडून दबावतंत्र वापरण्यात आले. मात्र भाजपाने १३२ आणि पाच अपक्ष आमदारांचे समर्थन मिळविल्यामुळे त्यांनी या दबावाला फारसे महत्त्व दिले नाही. तसेच शिवसेनेच्या काही नेत्यांकडून महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबविण्याची मागणी केली जात होती, त्यालाही भाजपाने फेटाळून लावले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद हे भाजपाकडेच राहिल, हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ल यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना बिहार पॅटर्न महाराष्ट्रात राबवता येणार नाही, असे सांगितले. “बिहारमध्ये जो पॅटर्न राबविला गेला, तोच महाराष्ट्रात राबविणे शक्य होणार नाही. बिहारच्या निवडणुकीआधीच भाजपाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता आणि तो त्यांनी पाळला. महाराष्ट्रात आम्ही असा कोणताही शब्द दिला नव्हता आणि इथे आमची संघटना अतिशय मजबूत आहे. निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदावर कायम राहतील, असा कोणताही शब्द त्यांना दिला गेलेला नव्हता. उलट, विधानसभेचे निकाल आल्यानंतर आकड्यांनुसार मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतला जाईल, असेच आमचे नेते प्रचारात सांगत होते.

हे वाचा >> शिंदे यांची माघार? मुख्यमंत्रीपदाचा देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा

एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला त्याचदिवशी प्रेम शुक्ल यांनी हे विधान केले आहे. शिंदे यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करून १४वी विधानसभा विसर्जित केली. त्यानंतर ते आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत.

महाराष्ट्र विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. मात्र महायुतीला त्याहून अधिक आणि प्रचंड भरघोस अशा जागा मिळाल्या आहेत. भाजपा १३२, एकनाथ शिंदेंची शिवसेना ५७ आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ४१ अशा जागा मिळाल्या आहेत. यानंतर शिवसेनेकडून (शिंदे) मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी दबावतंत्राचा वापर सुरू झाला.

भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, शिवसेनेच्या नेत्यांनी केलेली मागणी दिल्लीतील भाजपा नेत्यांना रुचलेली नाही. देवेंद्र फडणवीस हेच पुढील मुख्यमंत्री असतील असा निर्णय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आधीच कळविण्यात आला होता. भाजपाच्या राज्य विधिमंडळाची बैठक येत्या काही दिवसांत मुंबईत पार पडणार असून त्यात पक्षनेता निवडून याची अधिकृत घोषणा केली जाईल.

सोमवारी (२५ नोव्हेंबर) शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी बिहार पॅटर्नचा विषय काढला होता. “एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करतील असा आम्हाला (शिवसेना) विश्वास आहे. एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली जाईल अशी आम्हाला खात्री आहे. कारण आत्ता जे प्रचंड यश मिळालं आहे ते यश एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवलेल्या निवडणुकांमध्ये मिळालं आहे. मी माझ्या पक्षाचा साधा कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता म्हणून माझी ही भावना आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत.”असं नरेश म्हस्के यांनी म्हटले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp firm on fadnavis as chief minister bihar model doesnt apply in maharashtra kvg