मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचं ‘आजी-माजी आणि भावी सहकाऱ्यां’बद्दलचं एक विधान आज राजकीय वर्तुळात चांगलंच चर्चेत आलं आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानानंतर आता भविष्यात शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता भाजपाकडून देखील प्रतिक्रिया आली आहे. “उद्धव ठाकरेंनी ‘आपण भावी सहकारी होऊ’ अशा आशयाचं जे वक्तव्य केलं आहे त्यासाठी आमच्या शुभेच्छाच असतील. आम्हाला नाक मुरडण्याचं काहीच कारण नाही”, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. त्यामुळे, आता पुन्हा अनेक तर्क-वितर्कांना उधाण येण्याची शक्यता आहे.
भाजपासोबत जाण्यासाठी शिवसेना मोकळी! असा संदेश
“आता झालेली महाविकास आघाडी ही अनैसर्गिक आहे. त्यामुळे स्वाभाविकच नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपा संदर्भांत त्यांच्या आलेल्या भूमिकेचं स्वागतच असेल. परंतु, भाजपामध्ये कोणत्याही स्तरावर याबाबत काही ठरलेलं नाही. आज तरी तो विषय चर्चेसाठी नाही. असं वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांना असाही संदेश द्यायचा असू शकतो कि, पुन्हा भाजपासोबत जाण्यासाठी आम्ही मोकळे आहोत किंवा मुख्यमंत्र्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला इशारा देखील द्यायचा असेल”, असं देखील प्रवीण दरेकर म्हणाले. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असं देखील यावेळी प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे.
घटक पक्षांना इशारा
प्रवीण दरेकर म्हणाले की, “काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये एकमेकांवर या ज्या कुरघोड्या आणि दबावतंत्र सुरु आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांना सरकारमधील घटक पक्षांना इशारा द्यायचा असेल की, ‘तुम्ही शिस्तीत वागा नाहीतर मी भाजपासोबत चाललो.’ त्यामुळे हे दबावतंत्र देखील असू शकतं. राजकारणामध्ये काय होईल किंवा काय होणारच नाही असं कधीच नसतं. आज तरी तसा काही विचार नाही. सध्या सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करतो आहे. ते करत राहणार आहोत.”
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकाऱ्यांचा उल्लेख केला. यावेळी, व्यासपीठावर केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार रावसाहेब दानवे आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी मागे बघून ‘भावी सहकारी’ म्हणून संदर्भ दिला. त्यामुळे नेमका मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे आहे? याविषयी चर्चा सुरू झाली. “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माझी आणि एकत्र आले तर भावी सहकारी”, असा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळे त्यावरून वेगवेगळे तर्क काढले जात आहेत.