दिगंबर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : सांगली जिल्ह्यातील सुरेश खाडे यांना मंत्रीपदाची संधी देऊन सांगली जिल्ह्यातील आपला पाया अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचा संदेश भाजपने दिला आहे. खाडे यांना गतवेळी अवघ्या तीन महिन्याची मंत्रीपदाची संधी मिळाली होती, यामुळे त्यांना फारसे दिसण्यासारखे काम करता आले नसावे, आता त्यांना स्वप्रतिमा बळकटीकरणाबरोबरच पक्षाची प्रतिमा अधिक उजळ करण्याबरोबरच जिल्हा परिषदेसह नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीत पक्षाचा पाया भक्कम करण्याचे आव्हान असणार आहे.

तासगाव तालुक्यातील पेड येथील खाडे यांनी मुंबईमध्ये बांधकाम व्यवसायात जम बसल्यानंतर राजकीय कारकीर्द सुरू केली. प्रारंभीच्या काळात रिपाइंच्या माध्यमातून राजकीय भविष्य अजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अल्पावधीतच त्यांनी जतमधून भाजपच्या उमेदवारीवर पक्षाचे पहिले खाते काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यात खोलले. गेल्या चार विधानसभेतील कामाचा अनुभव गाठीशी असल्याने त्यांना सार्वजिनक कामे गतीने करण्याची माहिती आहे. यासाठी राजकीय साटेलोटे कसे करायचे याचेही गणित पक्के आहे.

भाजपला जिल्ह्यात मशागतीसाठी फार काही करावे लागले नाही. कधी काँंग्रेसअंतर्गत असलेल्या दुफळीचा तर कधी काँग्रेस-राष्ट्रवादीमधील संघर्षांचा नेमका कसा फायदा करून घ्यायचा याचे पक्के गणित त्यांच्याजवळ आहे. तरुण मंडळाना हाताशी धरून त्याचे मतामध्ये परिवर्तन करण्यात खाडे माहीर आहेत. याच जोरावर त्यांचे विधानसभेतील स्थान आतापर्यंत अढळ राहिले आहे. विरोधकांना राजकीय व्यासपीठावरून पालापाचोळा समजून त्यांनी वेळप्रसंगी बेदखलही केले आहे.

२०१४ च्या निवडणुकीत भाजपने जिल्ह्यात चार जागा जिंकल्या होत्या. यापैकी जत आणि शिराळा येथील दोन जागा २०१९ च्या निवडणुकीत पक्षाला गमवाव्या लागल्या. आता या जागा पुन्हा पक्षाला मिळवण्याचे प्रयत्न राहणार आहेतच, पण याचबरोबर पलूस, कडेगाव आणि तासगावची जागा जिंकण्याचे लक्ष्य राहणार आहे. या दृष्टीने मंत्री खाडे यांच्यावर जबाबदारी राहणार आहे. याचबरोबर येत्या सहा महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आणि त्यानंतर महापालिका निवडणुका होणार आहेत. या दोन्ही निवडणुकांमध्ये लोकसभेची निवडणूकही महत्त्वाची ठरणार आहे. यासाठीची तयारी मंत्री खाडे यांच्यावर पक्षाकडून सोपवली जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगलीतील राजकारणाला अनन्य महत्त्व आहे. या जिल्ह्यातील राजकीय घडामोडीचे पडसाद सातारा, सोलापूर आणि कोल्हापूरच्या राजकीय पटलावर उमटत असतात.

महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही दीड वर्षांपूर्वी भाजपला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते. राज्यातील सत्ताबदलाचा परिणाम म्हणून भाजपला गळती लागण्याची चिन्हे होती. खाडे यांच्याकडे मंत्रीपद आल्याने भाजपमधील गळती तर रोखली जाणार आहेच, पण याचबरोबर पुन्हा शतप्रतिशत भाजप हा नारा द्यावा लागणार आहे.

शहराबरोबरच जिल्ह्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. महामार्गामुळे जिल्ह्याची नाळ अन्य शहराशी जोडली गेली आहे. त्याचा फायदा जिल्ह्याला होण्यासाठी कृषी औद्योगिकीकरणाला गती देण्याची गरज आहे. केंद्रातील आणि राज्यातील सत्तेचा फायदा जिल्ह्याला झाला तर निश्चितच सांगलीकरांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. मंत्री खाडे यांच्यापुढे पक्षाचे बळकटीकरण करण्याबरोबरच समस्यांचा असलेला डोंगर कसा पार करतात याकडे जिल्हावासीयांचे लक्ष असेल.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात ताकद वाढविण्यावर भर दिला होता. तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात भाजपला शह दिला होता. सत्ताबदलानंतर भाजप पुन्हा जिल्ह्यात ताकद निर्माण करते का हे बघायचे.