BJP Leader Girish Mahajan met Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला बहुमत मिळाल्यानंतर आता राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यादरम्यान आज (२ डिसेंबर) भाजपाचे संकटमोचक अशी ओळख असलेले नेते गिरीश महाजन यांनी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील निवासस्थानी जात भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले, दरम्यान या भेटीनंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना महायुतीमध्ये सर्व काही अलबेल असल्याचे सांगितले.
एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर गिरीश महाजन म्हणाले की, “गेल्या ५-६ दिवसांपासून आमचे नेते एकनाथ शिंदे यांची तब्येत खराब होती. त्यांना घशाचं इन्फेक्शन, ताप देखील आहे.त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी आलो होतो. तीन-चार दिवसांपूर्वीच मी वेळ मागितला होता पण ते गावी निघून गेल्याने त्यांचा माझा संपर्क झाला नाही”, असे महाजन म्हणाले.
शिवसेना (शिंदे) आणि भाजपा यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याच्या मुद्द्यावर बोलताना महाजन म्हणाले की, “महायुतीमध्ये सगळं अलबेल आहे. आमच्यात कुठेही मतभेद नाहीत. त्यांनी (एकनाथ शिंदे) तीन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत याबद्दल स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळे आमच्यामध्ये मतभेद असल्याच्या अफवा येत आहेत. पण तसं काही नाही. एकनाथ शिंदे यांचे मन याबाबत स्वच्छ आहे. ५ तारखेची आमची तयारी सुरू आहे. ते स्वत: उद्यापर्यंत तब्येत जरा बरी झाल्यावर काही बैठकी घेणार आहेत. सूत्रांकडून ज्या सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत तसे कुठलेही मतभेद आमच्यात नाहीत”.
हेही वाचा>> प्रकाश आंबेडकरांचा EVM विरोधात एल्गार; म्हणाले, “वंचित बहुजन आघाडी यावेळी खाते उघडणार…
महायुतीच्या आगामी सरकारमध्ये कोणाला किती मंत्रीपदे मिळणार याबद्दल बोलताना महाजन म्हणाले की, “हा सगळा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. त्याबद्दल एक शब्दही आम्ही बोललो नाही. कोणती पदे, खातं कोणाला पाहिजे यावर आमची चर्चा झाली नाही. मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो”, असेही गिरीश महाजन म्हणाले.
“अजूनही हाताला सलाईन लागलेलं आहे, पण मला वाटते की उद्यापासून एकनाथ शिंदे सगळ्या गोष्टींची सुत्रे हातात घेतील. आम्ही सगळे एकत्रच आहोत, आमच्यामध्ये कुठलाही दुरावा नाही. आम्ही प्रामाणिकपणे युतीमध्ये सोबत आहोत. ५ तारखेला शपथविधी होणार आहे आणि त्यावेळी आम्ही सगळे सोबत असू”, असेही महाजन म्हणाले.
हेही वाचा>> “मी शिंदेंना तेव्हाच सांगितलं होतं की भाजपाकडून…”, बच्चू कडूंचा दावा; मुख्यमंत्रीपदाब…
…तर मग उशिर का?
महायुतीमध्ये सगळं व्यवस्थित असेल तर मग सत्ता स्थापनेला उशिर का होत आहे? याबद्दल विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, “कुठला उशीर? ५ तारीख ठरलेली आहे. जनता देखील खूष आहे, आम्ही देखील खूष आहोत. एकनाथ शिंदे यांची तब्येत खराब होती, चार पाच दिवस ते गावी होते, इथे आल्यावरही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आमच्यामध्ये कुठलेही मतमतांतरे नाहीत”, असे गिरीश महाजन म्हणाले.
भाजपाच्या अडचणीच्या काळात तुम्हाला संकटमोचक म्हणून पाठवले जाते, आजही तसेच काही झाले का? असे विचारले असता महाजन म्हणाले की, “हा प्रॉब्लेमच नव्हता. मी तब्येतीची चौकशी करायला आलो होतो. सव्वा तास आमची खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांच्या मनात कुठलाही शंका नव्हती. एकनाथ शिंदे यांच्यासारखा मोठ्या हृदयाचा माणूस… मी त्यांना आज नाही ३० वर्षांपासून बघतोय, त्यांना मी चांगलं ओळखतो. त्यामुळे अशा छोट्या-मोठ्या गोष्टींमुळे ते रूसलेत, रागवलेत किंवा चिडलेत असं काही होणार नाही”,असेही गिरीश महाजन यावेळी म्हणाले.