Girish Mahajan on Harshvardhan Patil: गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून हाती तुतारी घेतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. खुद्द हर्षवर्धन पाटील यांनीही मतदारसंघातील कामांबाबत नाराजी व्यक्त केल्यामुळे त्यासंदर्भातल्या चर्चेला बळ मिळालं होतं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला हर्षवर्धन पाटील यांच्या रुपाने मोठा फटका बसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांच्याबाबतच्या चर्चांवर भाजपाचे नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले गिरीश महाजन?
मंत्री गिरीश महाजन यांच्या मुंबईतील घरी आज गणरायाचं आगमन झालं. यावेळी हर्षवर्धन पाटीलही उपस्थित होते. यासंदर्भात टीव्ही ९ शी बोलताना गिरीश महाजन यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याबाबतची भूमिका स्पष्ट केली. “हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेत आहेत या सगळ्या अफवा आहेत. एका साखर कारखान्याच्या बैठकीच्या संदर्भात ते पुण्याला एकत्र आले होते. त्यांच्यावर केंद्राची सहकार खात्यासंदर्भातली साखर कारखान्यांची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना जाणं अपरिहार्य होतं. ते एका ठिकाणी भेटून बोलले याचा अर्थ ते तिकडे चालले असं समजण्याचं कारण नाही”, असं गिरीश महाजन म्हणाले.
“अनेक कार्यक्रमांमध्ये आम्ही नेते एकमेकांना भेटत असतो. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही तुतारी हाती घेतली किंवा मशाल हाती घेतली. हर्षवर्धन पाटील आमच्यासोबतच आहेत. त्यांच्या मतदारसंघाबाबतच्या नक्कीच काही अडचणी आहेत. पण त्या सोडवल्या जातील. देवेंद्र फडणवीस स्वत: त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी बोलत आहेत. हर्षवर्धन पाटील माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. त्यामुळे मला वाटतं की या सगळ्या अफवा आहेत”, असं गिरीश महाजन यांनी यावेळी नमूद केलं.
महायुतीमध्ये कोण किती जागा लढवणार?
दरम्यान, शिंदे गटाकडून १२० जागा लढवण्याचा दावा करण्यात येत असून त्यातून १०० आमदार निवडून आणू, असंही म्हटलं जात असल्याबाबत गिरीश महाजन यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा हे सर्व निर्णय दिल्लीत होतील, असं ते म्हणाले. “जागावाटपाचा निर्णय केंद्रीय समिती घेईल. तिथे आमचे युतीमधले नेते आहेत. आता आम्ही यावर बोलण्याला काहीही अर्थ नाही”, असं ते म्हणाले.
जयंत पाटील यांच्यावर टीका
दरम्यान, जयंत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाजारांबाबत सूरतहून खंडणी मागितली, असं विधान केल्याबाबत विचारलं असता त्यावर महाजनांनी टीका केली. “शिवाजी महाराजांबाबत अशी टीकाटिप्पणी कुणी करूच नये. पुतळा पडणं ही दुर्दैवी घटना होती. पण जोडे मारो वगैरे आंदोलन चालू आहे. कुठल्या गोष्टीचं राजकारण करावं हे कळायला हवं. दोषींना शोधून काढलं आहे आपण. शिवाजी महाराजांच्या विषयावर जयंत पाटलांनी हे बोलणं वेदनादायी आहे. सगळ्यांनीच अशा विधानांपासून लांब राहावं”, असं त्यांनी नमूद केलं.