राज्याच्या झालेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपाने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला. मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या शिवसेनेची चौथ्या क्रमांकावर पीछेहाट झाली, तर सरकारमध्ये महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या राष्ट्रवादीने दुसरा क्रमांक पटकावून राज्यात पक्षाची ताकद वाढवली. काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर असला तरी विदर्भाने नेहमीप्रमाणे काँग्रेसला साथ दिली. अनेक दिग्गज नेत्यांनाही निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.
शिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी
अत्यंत चुरशीच्या झालेल्या बोदवड नगरपंचायतीच्या निकालात शिवसेनेने मुसंडी मारली. नऊ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बोदवड नगरपंचायत ताब्यात घेतली. राष्ट्रवादी एकनाथ खडसे यांना हा आपल्याच होमपीचवर जबर धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला ७ जागा आल्या, तर भाजपाला अवघी एक जागा मिळवता आली. ईश्वरचिठ्ठीने ही जागा भाजपाकडे आली. त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला.
शिवसेना-भाजपाची छुपी युती
एकनाथ खडसे यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना शिवसेना आणि भाजपाची छुपी युती असल्याचा आरोप केला होता. “एक जागा ईश्वरचिठ्ठीने आणि एक जागा सहा मतांनी गमावली आहे. पण शेवटी पराभव तर पराभवच आहे. भाजपा आणि शिवसेनेची छुपी युती होती. गिरीश महाजन आणि शिवसेनेच्या स्थानिक आमदारांमध्ये तीन दिवसांपूर्वी चर्चा झाली. पेपरमध्ये फोटोही आले आहेत. त्यामुळे फक्त राष्ट्रवादीचा पराभव करा या हेतूने सर्व पक्ष एकत्र आले होते. तरीही आम्हाला चांगलं यश मिळालं आहे. ईश्वचिठ्ठीमुळे दुर्दैवाने गेलो नाहीतर बहुमतापर्यंत आलो असतो. पण हा पराभव का झाला याचं चिंतन करण्याची गरज असून आम्ही ते करु,” असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं होतं.
गुलाबराव पाटलांचा भाजपा कार्यकर्त्यांकडून सत्कार; गिरीश महाजनांसोबत गाडीत बसून चर्चा; चर्चांना उधाण
दरम्यान भाजपा नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर टीका केली असून ज्याच्याच दम असतो तो निवडून येतो असं म्हटलं आहे. “बोदवड नगरपंचायतीबाबतीत एकनाथ खडसे यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. विधानसभेत एकनाथ खडसे पडले; खरं तर ते मुख्यमंत्री यांच्या शर्यतीत होते. बोदवडमध्ये हारले तर आता कारणं कशाला सांगत आहात. मोठ्या मनाने सांगाना आम्ही हरलो. ज्याच्यात दम आहे तो निवडून येतो. मुक्ताईनगरमध्ये त्यांचे सरकार नाही, त्यांच्या गावात त्यांचे सरकार नाही. काही कारणं सांगायची आणि आपली पुंगी वाजायची असा प्रकार खडसे यांचा सुरू,” असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.
गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण
दरम्यान निवडणुकीत मतदानाअगोदर शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यात भेट झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान निकालानंतर पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने राजकीय चर्चा रंगली आहे जामनेरमध्ये एकाच गाडीमध्ये बसून दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
गुलाबराव पाटील गिरीश महाजन यांच्या घरी पोहोचले होते. विशेष म्हणजे यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला.