पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार प्रदीर्घ काळानंतर उपस्थित राहत आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना निमंत्रित केलं आहे. दरमयान यावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही चौंडीत होणार आहे. मात्र पोलिसांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना रोखलं असून यामुळे रस्त्यावरच समर्थक आणि पोलिसांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.
पवार व पडळकर हे विरोधक एकाच ठिकाणी येत असल्याने संघर्ष अटळ ठरण्याची चिन्हं होती. कार्यक्रमस्थळी शरद पवारांची सभा होणार असल्याने पोलिसांनी संघर्ष टाळण्यासाठी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा ताफा चौंडीच्या वेशीवर रोखला आहे. यामुळे गोपीचंद पडळकरांचे समर्थक संतापले असून पोलिसांसोबत वाद घालत आहेत.
शरद पवार व गोपीचंद पडळकर एकाच दिवशी चौंडीत; राजकीय संघर्षाची चिन्हे
आम्हाला जाऊ द्या, अहिल्यादेवींचं दर्शन घेऊ द्या तिथे नतमस्तक होऊ द्या. आम्हाला आडकाठी कशासाठी केली जात आहे? असं गोपीचंद पडळकर एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत. “मी २९ तारखेला पत्र दिलं आहे. ज्याचं पहिलं पत्र आहे त्याला परवानगी द्या असं कायदा सांगतो. रोहित पवारांनी, त्यांच्या आजोबांनी काय कायदा लिहिला आहे का?,” असा सवाल गोपीचंद पडळकरांनी यावेळी विचारला.
“हा राजकीय कार्यक्रम नाही, कुणीही…”; अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्यानिमित्त विरोधकांना इशारा
“याआधी कधी राष्ट्रवादीच्या नावे जयंती झाली नाही. सर्वसमावेश जयंती साजरी होती. याआधी रोहित पवारांना आणि त्यांच्या आजोबांना चौंडी का दिसली नाही? जयंतीला का आला नाहीत? का दर्शनासाठी येथे आला नाहीत? आता तुम्हाला राजकारण करायचं आहे आणि आमचं ऊर्जास्थान तयार झालेल्या चौंडी येथे तुम्हाला हल्ला करायचा आहे. आमचा इतिहास तुम्हाला बुजवायचा आहे, बहुजनांचे लचके तोडायचे आहेत म्हणून हा घाट घालता. शरद पवार आणि त्यांच्या नातवाने कार्यक्रमाला गालबोट का लावलं आहे?,” अशी विचारणा यावेळी पडळकरांनी केली आहे.
“महाराष्ट्रात याआधी असं घडलं होतं का? राष्ट्रवादीच्या नेत्यांना याचं प्रायश्चित्त भोगावं लागेल” असा इशारा यावेळी पडळकरांनी दिला आहे.
तुम्हाला का रोखलं जात आहे असं वाटत असल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “यांचा बुरखा फाटण्यात आम्ही गेल्या दोन वर्षात यशस्वी झालो आहोत. त्यांना आता आपल्या लेकीची, नातवाची काळजी लागली आहे. पुढे लोक त्यांना जोडायचं आहे. आम्ही या महापुरुषासाठी काहीतरी करत आहोत असं दाखवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मी हिंदू आहे हे म्हातारपणी सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मी हनुमान मंदिरात जाऊन माझ्या राजकारणाच्या प्रचाराचा नारळ फोडतो हे सांगावं लागतं. किती वाईट वेळ आली आहे”.
“सर्व भाडोत्री आणलेला जनाधार आहे. जनाधार दिसत आहे तर मग मला कशाला थांबवलं? ही रोजगाराने आणलेली लोकं, पक्षातील लोक तिथे उपस्थित आहेत,” असं पडळकर म्हणाले.
“गोपीचंद पडळकर रडणारा नाही तर लढणारा आहे. लोकशाहीत कायद्याला हे महत्व देत नाहीत, वागत नाहीत. पण मी तक्रार करणार नाही. वाघाला दगड मारल्यानंतर तो चवताळून दगड मारणाऱ्याच्या नरडीचा घोट घेतो. तुम्ही जर आमच्या इतिहासाशी छेडछाड करत असाल, अहिल्यादेवींच्या प्रेरणास्थानवार घाव घालत असाल तर बहुजनांची मुलं तुमच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही,” असाही इशारा पडळकरांनी दिला.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासाठी आम्ही काय दहशतवादी आहोत का? अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली. शरद पवार आल्यानेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं पडळकर म्हणाले.