पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागून आता आठवडा लोटला आहे. मात्र, तरीदेखील राज्याच्या राजकारणात त्यावरची चर्चा आणि दावे-प्रतिदावे थांबायला तयार नाहीत. पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव करत भाजपाचे उमेदवा समाधान अवताडे यांनी विजय संपादित केला आहे. या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात बदल होण्याचे दावे आता भाजपाकडून केले जाऊ लागले आहेत. “पंढरपूर विधानसभा पोटनिवणुकीचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा आहे”, असं ते म्हणाले. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना एका वक्तव्यावरून टोला देखील लगावला आहे.
पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते भारतनाना भालके हे आमदार होते. मात्र, त्यांच्या निधनामुळे इथे पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत सहानुभूतीची लाट असल्यामुळे भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके निवडून येतील असा कयास सत्ताधारी महाविकासआघाडीकडून बांधला जात होता. त्यानुसार तिन्ही पक्षांनी आपली ताकद राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेल्या भगीरथ भालके यांच्या पाठिशी लावली. मात्र, मतदारांनी कौल दिला तो भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या बाजूने! त्यामुळे महाविकासआघाडीला हा मोठा झटका मानला जात आहे.
“निम्म मंत्रिमंडळ ठाण मांडून होतं!”
यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी सत्ताधारी महाविकासआघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची निवडणुकीपूर्वी १५ ते २० दिवस अशी वक्तव्य होती की आम्ही ५० ते ८० हजार मतांच्या फरकाने निवडून येणार आहोत. अजितदादांचं वक्तव्य होतं की ४ पक्षांपैकी ३ पक्ष आम्ही एकत्र आहोत. असा कोणता माईचा लाल आहे जो निवडून येईल? तो माईचा लाल समाधान अवताडेंच्या रुपाने महाराष्ट्राला मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे आविर्भावात वागत होते की आम्ही तिघं एकत्र आहोत, त्यामुळे जे आम्ही म्हणू तेच होईल. विश्वासघातानं सत्तेत येता येतं, पण लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहेत”, अशा शब्दांत पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
पाहा नेमकं काय म्हणाले गोपीचंद पडळकर!
“अजित पवार ५ दिवस इथे होते…”
“स्वर्गीय भारतनाना भालके यांच्यासारखा लोकांशी कनेक्ट असणारा माणूस पश्चिम महाराष्ट्रात नाही. सहानुभूतीची लाट असताना भाजपाचा उमेदवार निवडून येतो. राज्यातलं निम्म मंत्रिमंडळ तिथे थांबून होतं. अजित पवार ५ दिवस मतदारसंघात होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दरदिवशी सांगलीत मीटिंग झाली की पंढरपूरला जात होते. अशा स्थितीत पैशाचा वापर आणि सरकार असूनही तिथल्या लोकांनी या आघाडीला नाकारलं. मतदारांना संधी त्यांना मिळाली होती. त्या संधीचं पंढरपूरच्या जनतेनं सोनं केलं”, असं ते म्हणाले.
“आरोग्यमंत्री गांजा ओढून पत्रकार परिषद घेतात का?” गोपीचंद पडळकरांची सरकारवर परखड टीका!
“देगलूरमध्ये शिवसेना माजी आमदाराचा इशारा!”
दरम्यान, नांदेड-देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या उमेदवारीवरून शिवसेनेत वाद असल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. “नांदेडमध्ये देगलूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक आहे. पंढरपूरचे हादरे नांदेडपर्यंत गेले आहेत. तिथल्या शिवसेनेच्या माजी आमदारांनी थेट सांगितलं आहे की जर तुम्ही मला तिकीट दिलं नाही तर मी भाजपामध्ये जाणार आहे. त्यामुळे राज्यातल्या स्थितीत तिथून बदल होतोय”, असं ते म्हणाले.