राज्यात अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांना लसीकरण सुरू करता येणार नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरोग्यमंत्र्यांवर आणि राज्य सरकारवर देखील सडकून टीका केली आहे. “सकाळी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी घोषित केलं की १ तारखेपासून आम्ही १८ ते ४४ वयोगटातल्या लोकांना लसीकरण करणार आहोत. आणि संध्याकाळी ४ वाजता सांगितलं की ते करता येणार नाही. हे इतके गोंधळलेले लोक आहेत. यांना लोकांचं घेणं-देणं नाही. सकाळी तुम्ही घेतलेली पत्रकार परिषद मग गांजा ओढून घेतली होती का? तुम्हाला माहीत नव्हतं का? सकाळी सांगता मोफत लस देणार आहोत आणि ४-५ तासांनी सांगता की आमच्याकडे तेवढ्या लसी उपलब्ध नाहीत”, असं पडळकर म्हणाले आहेत. ते सांगलीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

“यांना केंद्राला बदनाम करायचं आहे”

यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर देखील निशाणा साधला. “हे तिन्ही पक्ष विचारसरणी एक नसताना भाजपाची जिरवण्यासाठी हे पक्ष एकत्र आले आहेत. यांना ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवायचं आहे. केंद्राला बदनाम करायचं आहे. या सरकारने यातून बाहेर येऊन केंद्राकडे बोट न दाखवता कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये यासाठीचं नियोजन करावं इतकीच आमची महाराष्ट्र सरकारकडे विनंती आहे”, असे ते म्हणाले.

उद्धवजी, शिवभोजन थाळी खायचीये, पण जायचं कसं?; पडळकरांनी व्हिडीओ केला शेअर

राज्य सरकारची वसुलीची भूमिका!

रेमडेसिविरच्या काळ्या बाजारावरून पडळकरांनी राज्य सरकारवर टीका केली. “रेमडेसिविरचा काळा बाजार नेमका कोण करतोय? जे इंजेक्शन जिल्ह्यांना दिलेत, त्याची यादी प्रत्येक लोकप्रतिनिधीला दिली पाहिजे. या काळ्या बाजारात हात धुवून घेण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आणि काही अधिकाऱ्यांचा सुरू आहे. जे कुणी यात आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. ही काही लोणी खायची वेळ नाही. पण राज्य सरकारने वसुलीची भूमिका घेतल्यामुळे खालच्या लोकांनाही तीच सवय लागली आहे”, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

Story img Loader