गेल्या महिन्याभरापासून राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचारी संपावरून सध्या राजकारण तापलं आहे. एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असतानाच विरोधकांनी देखील या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका सुरूच ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार गोपीचंद पडळरक यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. तसेच, संपकरी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याच्या विचाराचा देखील त्यांनी निषेध केला आहे. यावेळी मुंबईतील मिल कामगारांच्या संपाप्रमाणेच एसटी संपाचीही अवस्था करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका मांडली. पगारवाढ आणि वेतनहमीनंतरही एसटी कर्मचाऱ्या संपावर ठाम असल्यामुळे आता राज्य सरकारकडून त्यांना सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. सोमवारपर्यंत कर्मचारी कामावर रुजू झाल्यास त्यांचं निलंबन मागे घेण्यात येईल, त्यानंतर मात्र कठोर कारवाई केली जाईल, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे.
“मंत्री म्हणून अनिल परब अपयशी”
दरम्यान, या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. “परिवहन मंत्री अनिल परबांनी आपलं अपयश झाकण्यासाठी मी आणि सदाभाऊ खोत एसटी कर्मचाऱ्यांची डोकी भडकवत आहेत असा आरोप केला. पण तीन आठवड्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील ते आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. आता ते मुघलशाही पद्धतीने मेस्मा लावण्याची धमकी देत आहेत. त्यांच्या या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
आता एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचा अल्टिमेटम; अनिल परब म्हणतात, “जर सोमवारपर्यंत…!”
“मनापासून कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला असता तर आज नक्कीच काहीतरी मार्ग निघाला असता. मुंबईत मिल कामगारांचा संप झाला आणि तो संप चिघळवला गेला आणि तसाच अनिर्णित ठेवून मिल मालकांशी हातमिळवणी करत करोडोंच्या जागा लाटल्या गेल्या, त्या जागांमध्ये मोठा घोटाळा केला गेला. त्याच पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळवून विविध ठिकाणी असलेल्या मोक्याच्या जागांची विल्हेवाट लावण्याचा डाव अनिल परब आणि सरकारचा दिसतोय”, असा आरोप देखील गोपीचंद पडळकर यांनी केला.