केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार सर्वच आघाडीवर अपयशी ठरले असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाळव्यातील सभेत केली. आम्हीही परदेश दौरे केले मात्र त्यासाठी विमान प्रवास करणाऱ्यांना ताटकळत ठेवण्याचे काम कधी केले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिलीप पाटील व अन्य राष्ट्रवादीच्या संचालकांचा सत्कार वाळव्यात आयोजित करण्यात आला होता. हा सत्कार श्री. पवार यांच्या हस्ते व आ. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
या वेळी बोलताना श्री. पवार म्हणाले, की केंद्र आणि राज्य सरकारला सामान्य माणसाच्या सुखदु:खापेक्षा भांडवलदारांचे हित जोपासण्याची घाई झाली आहे. ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला असतानाही जाहीर केलेले पॅकेज अद्याप देण्यात आलेले नाही. भविष्यात हा शेतकरी उसापासून बाजूला गेला तर त्याचे परिणाम सर्वानाच भोगावे लागणार आहेत. साखर उत्पादन घटले तर साखर आयातीशिवाय पर्याय उरणार नाही, यामुळे परकीय चलन साठय़ावरही परिणाम होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात दौरे करतात, गुंतवणूक आणल्याचे सांगतात, मात्र गेल्या वर्षभरात मोठी गुंतवणूक झाल्याचे कोठेही आढळत नाही. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाल्याचे आढळत नाही. कुठे उद्योग वा कारखाने उभे राहिल्याचे दिसत नाही मग अच्छे दिन कसे म्हणायचे?
राज्यात ५ लाख कोटींचे रस्ते बांधणार असल्याचे राज्य शासन सांगत आहे. पण त्यासाठी पशाची व्यवस्था काय करणार? एकीकडे राज्य शासनाच्या तिजोरीत पसे नसल्याचे सांगता मग घोषणांचा पाऊस कशासाठी असा सवालही त्यांनी केला. धनगर समाजाला आरक्षण देणार असे निवडणुकीपूर्वी सांगत होता, अशा अनेक घोषणा केल्या मात्र त्या पूर्ण करण्याकडे या शासनाची वाटचाल दिसत नाही असेही पवार म्हणाले.
राज्य मंत्रिमंडळातील एका एका मंत्र्याकडे आठ-आठ खात्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. यामुळे कोणताही निर्णय लवकर घेतला जात नाही. पासपोर्ट राहिला म्हणून विमानाला दीड तास विलंब केला जातो असे आमच्या काळात कधी झाले नव्हते. सहकारची तर वाट लावण्याचा चंगच यांनी बांधला असून सहकार उद्ध्वस्त करायला हे सरकार निघाले आहे की काय असा सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला. उठ सूट आंदोलन करणारे स्वाभिमानीवाले आता का गप्प आहेत. उसाला केवळ शरद पवार होते तोपर्यंतच दर मिळत होता हे आता तरी लोकांच्या लक्षात आले असेलच असेही ते म्हणाले.
‘भाजपा सरकार सर्वच आघाडीवर अपयशी’
केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार सर्वच आघाडीवर अपयशी ठरले असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाळव्यातील सभेत केली. आम्हीही परदेश दौरे केले मात्र त्यासाठी विमान प्रवास करणाऱ्यांना ताटकळत ठेवण्याचे काम कधी केले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
First published on: 05-07-2015 at 02:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp government in all fail ahead