भाजपा नेते व राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकारपरिषदेत बोलताना, राज्यात भाजपाचं सरकार येणारचं असं ठणकावून सांगितलं आहे. या अगोदर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी अशा प्रकारचं विधान केलं होतं. त्यानंतर आता दरेकरांनी देखील हे विधान केल्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

नंदुरबार येथे पत्रकारपरिषदेत बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, “सरकार तर भाजपाचं येणारचं, फक्त आता आम्ही भविष्यवाणी आज, उद्या, परवा करत नाही. पण महाराष्ट्राच्या भविष्यासाठी भाजपाच्या सरकार शिवाय पर्याय नाही. हे तीन तिघाडं सरकार महाराष्ट्राचं हीत करू शकत नाही. कारण, सरकार चालवत असताना तुम्हाला एक वाक्यता लागते, समन्वय लागतो, निर्णय क्षमता लागते, वेळ द्यावा लागतो. मुख्यमंत्री महाराष्ट्रासाठी वेळ देताना दिसत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रामधील सगळे प्रकल्प ठप्प आहेत. आरक्षणाचे विषय प्रलंबित आहेत. आरक्षणाची गाजरं दाखवतात, मराठा समजाला आज आरक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे या सगळ्यावर जर महाराष्ट्राचं पुन्हा सुरळीत कामकाज सुरू व्हायला पाहिजे, तर या राज्याला सद्यस्थिती भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारचीच आवश्यकता आहे.”

नारायण राणेंच्या राज्यातील सत्ताबदलाबाबतच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांची हसून प्रतिक्रिया, म्हणाले…

“जेव्हा अतिवृष्टीतीत मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विदर्भ, मराठवाडा फिरलो. त्यावेळी शेतकऱ्यांची उत्सुफूर्त भावन होती, की आपल्यावेळेला आमच्या खात्यात पैसे येत होते. आम्हाला मोबाईल दाखवत होते. आता केवळ मोदी सरकारचे पैसे येतात, आम्ही मोबाईलकडे बघत असतो पण राज्यशासनाकडून एक रुपया येत नाही. आपल्या काळात पीक विम्याचे पैसे भरलेले नसताना, अर्धा पीक विमा मिळत होता. मात्र आता पूर्णपणे भ्रमनिरास महाराष्ट्रामधील जनतेचा झालेला आहे. काँग्रेसने वचननाम्यात एसटीच्या विलीनिकरणाचं वचन दिलं होतं, बेरोजगारांना ५ हजार रुपयांचा भत्ता देऊ असं म्हटलं होतं. त्यामुळे हे तिन्ही पक्ष जनतेच्या नजरेतून उतरलेलं आहे. त्यामुळे राज्यातील जनता प्रार्थना करत आहे की हे सरकार कधी जाऊन, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येतं आणि तो दिवस लांब आहे असं मला वाटत नाही.” असं देखील दरेकर यांनी यावेळी बोलून दाखवलं.

तसेच, “सहकारी कारखाने बंद पाडायचे. कवडीमोल भावात ते विकत घ्यायचे, असा धंदा सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. सहकारातून निर्माण झालेले ही चळवळ नेस्तनाबूत करण्याचे काम पद्धतशीर होत आहे.” अशी देखील यावेळी दरेकरांनी टीका केली.

याचबरोबर, “विकास ही सरकारची प्रायोरिटी नाही. शेतकऱ्यांना हमी भाव नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. महिला सुरक्षित नाही, परंतु सरकारला समीर वानखेडेचा प्रश्न महत्वाचा वाटतो. आपले अपयश लपविण्याचे काम सुरू आहे.” असा आरोपही महाविकासआघाडी सरकारवर प्रवीण दरेकर यांनी केला.

नारायण राणेंच्या राजकीय भविष्यवाणीला नाना पटोले, नवाब मलिक आणि अनिल परब यांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारचं आयुष्य जास्त नसल्याचं विधान केलं होतं. तसेच लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल, अशी नवी राजकीय भविष्यवाणी देखील केली होती. यावेळी त्यांनी एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात, असंही म्हटलं होतं

“सरकार पाडून नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित…”, नारायण राणेंची नवी राजकीय भविष्यवाणी

महाराष्ट्र सरकार भेदभाद करत असल्याच्या आरोपावर बोलताना नारायण राणे म्हणाले, “महाराष्ट्रात भाजपाचं सरकार नाही त्यामुळे तिथं तसं होतंय. लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. माझ्या आतमध्ये जी गोष्ट आहे ती आत्ताच बाहेर सांगायची नाहीये. एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. अशा ठिकाणी काही बोललो तर आणखी एखादा महिना पुढे ढकलेल.”

.

Story img Loader