वाई : ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्सच्या व्यतिरिक्त सुद्धा लोकप्रतिनिधींना अपात्र करण्याचे नवे हत्यार भाजपाला मिळाल्याची टीका आमदार शशिकांत शिंदे यांनी मोदी सरकारवर केली. साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात आयोजित जनता दरबारानंतर शिंदे पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनता दरबारात नागरिकांनी ५६ हून अधिक तक्रारी मांडल्या त्यावर आमदार शशिकांत शिंदे यांनी या तक्रारींचा निपटारा संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून केला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, युवक प्रदेश उपाध्यक्ष तेजस शिंदे, विद्यार्थी प्रदेश उपाध्यक्ष अतुल शिंदे, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा कविता म्हेत्रे, प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी समिंद्रा जाधव, महिला जिल्हाध्यक्ष संजना जगदाळे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शफिक शेख तसेच आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणूका स्वबळावर लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार शिंदे म्हणाले, ज्या मोदींनी राहुल गांधी यांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला त्यांनीच हा दावा मागे घेण्याचे सुतोवाच केले होते. काहीतरी गडबड होते तोच दावा पुढे लगेच सुरु केला जातो आणि एका महिन्यात निर्णय होतो. एका दिवसात राहुल गांधी यांचे खासदारकीचे पद रद्द होते. हा लोकशाहीचा नवा पायंडा आपल्याला पहायला मिळतो.
हेही वाचा >>> आता ठाकरे संपले : नारायण राणे
ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स व्यतिरिक्त सुद्धा आता अपात्र करण्याचे हत्यार भाजपला यामाध्यमातून मिळाले आहे अशी टीप्पणी त्यांनी केली. आमदार शिंदे यांनी फडणवीस सरकार तसेच केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. साडे सहा लाख कोटींचा राज्याचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. त्यात योजनांच्या घोषणांचा सुळसुळाट होता. पण, त्याला पैसा कोठुन उभा करणार हा प्रश्न आहे. यातील बहुतांशी योजना केंद्राच्या असून त्यांच्याकडून पैसे कधी येतील त्यावर या योजनांचे भवितव्य अवलंबून आहे.
अद्यापही त्यांनी राज्याचा जीएसटी परतावा दिलेला नाही. आपण परत एकदा कर्ज काढण्याच्या बाबती निर्णय घेतला आहे. साडे सात हजार कोटीच पुरवणी बजेट त्यांनी मार्चमध्ये बजेटच्या दिवशीच आणले, म्हणजेच सरकार फेल्युलर आहे. महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान जाहीर केले. त्यातील पहिला टप्पा दिला आणि सरकार गेलं. पण, आताच्या सरकारच्या काळात दुसरा, तिसरा टप्प्यातील शेतकऱ्यांना अजून पैसे मिळाले नाहीत. पैशाचे कसलेही नियोजन नाही. आता नुसतीच १२०० कोटींची तरतूद केलेली आहे.