जामखेड तालुक्यातील खर्डा येथे प्रेमप्रकरणातून हत्या झालेल्या नितीन आगे या दलित युवकाच्या कुटुंबीयांची भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी बुधवारी भेट घेऊन या पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. या कुटुंबाला पक्षाच्या वतीने त्यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. नितीन ज्या शाळेत शिकत होता, त्या शाळेतील शिक्षकांच्या वागणुकीबद्दलही त्यांनी या भेटीत संताप व्यक्त केला.
बुधवारी सकाळी मुंडे यांनी खर्डा येथे जाऊन पीडित आगे कुटुंबाची भेट घेतली. आमदार राम शिंदे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, जामखेडचे सभापती डॉ. भगवान मुरूमकर, भाजपचे तालुकाध्यक्ष रवि सुरवसे, भाजयुमोचे संजय गापाळघरे, मनोज राजगुरू, बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे आदी या वेळी उपस्थित होते.
मुंडे यांनी या वेळी नितीनच्या मारेकऱ्यांना फाशीचीच शिक्षा मिळावी अशी मागणी केली. ते म्हणाले, राज्यकर्त्यांसह अनेकांनी त्याची दखल घेऊन कुटुंबीयांना धीर दिला, मात्र नितीन ज्या शाळेत शिकत होता, त्या शाळेतील एकाही शिक्षकाने ही माणुसकी दाखवली नाही. शाळेतील शिक्षक किंवा मुख्याध्यापक कोणीही या कुटुंबाकडे फिरकले नाही, ही संतापजनक बाब आहे अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
या वेळी मिळालेल्या वरील माहितीने ते संतापले. गेल्या दि. २८ एप्रिलला नितीनची निर्घृण हत्या झाली, त्याची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली. त्यानंतर राज्याच्या गृहमंत्र्यांपासून अनेकांनी येथे भेट देऊन या कुटुंबाला मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे हत्या करण्याआधी नितीनला येथील त्याच्या शाळेतूनच उचलून नेण्यात आले अशी त्याच्या कुटुंबाची तक्रार आहे. ही गोष्टही समाजात कमालीची संतापजनक ठरली. या पाश्र्वभूमीवर मुंडे यांनी वरीलप्रमाणे भावना व्यक्त केल्या. शाळेतून उचलून नेताना आधी नितीनला येथेच मारहाण झाली असे सांगून मुंडे यांनी याही गोष्टीचा तीव्र शब्दांत निषेध केला.
दरम्यान या गुन्हय़ात अटक केलेल्या आरोपींची संख्या आता तेरा झाली आहे. सचिन हौसराव गोलेकर (वय २१), शेषराव साहेबराव येवले (४२), नीलेश महादेव गोलेकर (२३), विनोद अभिमन्यू गटकळ (२३), राजकुमार शेषराव गोलेकर (२४), भुजंग सूर्यभान गोलेकर (४०), सिद्धेश्वर विलास गोलेकर (३०), संदीप तुकाराम शिकारे (२४), साईनाथ साहेबराव गोलेकर (४५), विकास हरिभाऊ ढगे (२३), साईनाथ रावसाहेब येवले (४५) यांच्यासह दोन अल्पवयीन आरोपींचाही त्यात समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा