सत्ता राखताना गटातटांत समन्वय महत्त्वाचा; छोटय़ा पक्षांची भूमिका निर्णायक ठरण्याची चिन्हे

गेल्या अडीच वर्षांपासून अकोला महापालिकेत काठावर सत्तेत असलेल्या भाजपला आता स्वबळावर सत्ता काबीज करण्याचे वेध लागले आहेत. शहरात सुरू असलेल्या कोटय़वधी रुपयांच्या विकास कामांच्या जोरावर भाजपने जोरदार प्रचार मोहीम सुरू केली. मात्र, अकोल्यात भाजपपुढे गटबाजीसह बंडखोरी रोखण्याचे आव्हान उभे ठाकणार आहे. याशिवाय कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना, भारिप-बमसंसह एमआयएम पक्षानेही निवडणुकीसाठी कंबर कसल्याने अकोल्यात बहुरंगी लढत होण्याचे संकेत मिळत आहेत.

अकोला मनपाच्या २० प्रभागातील ८० नगरसेवक निवडून देण्यासाठी २१ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत स्बळावर लढण्याकडे सर्वपक्षांचा कल आहे. या अगोदर झालेल्या महापालिका निवडणुकीत २००२, २००७ आणि २०१२ मध्ये भाजप- शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली होती. जागा वाटपावरून  तणातणी झाल्यानंतरही अंतिम क्षणी युती व आघाडी करण्यात आली. आता मात्र सर्वपक्षांनी स्वबळाचा नारा देत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. अकोला महापालिकेत बहुमतात सत्तेत येण्यासाठी भाजपने गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे. अकोला शहरात भाजपचा एक राज्यमंत्री, एक खासदार आणि दोन आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. मनपा निवडणूक प्रमुख म्हणून खासदार संजय धोत्रे तर, सहप्रमुखपदी आ. गोवर्धन शर्मा यांची पक्षाने नियुक्ती केली आहे. भाजपची उमेदवारी मिळण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. त्यातच मर्जीतील उमेदवाराला तिकीट मिळवून देण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ होणार आहे.

पक्षात दोन गट

अकोला जिल्हय़ात भाजपमध्ये गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील व खा. संजय धोत्रे यांचे दोन प्रमुख गट आहेत. खा. धोत्रे गटाची संघटनेवर मजबूत पकड आहे. भाजपच्या तिकीटवाटपामध्येही खासदार धोत्रे यांच्यासह आमदार शर्मा आणि आमदार रणधीर सावरकर यांची प्रमुख भूमिका राहणार आहे. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार असलेले डॉ. रणजित पाटील त्यातच व्यस्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत धोत्रे गट वरचढ ठरण्याची शक्यता आहे. ८० जागांसाठी भाजपकडून लढण्यासाठी सुमारे ४०० जण इच्छुक आहेत. प्रत्येक जागेसाठी ४ ते ५ अर्ज भाजपकडे आले आहेत. भाजपचे वर्चस्व असलेल्या प्रभागांमध्ये तर ही संख्या १० ते १२ पर्यंत आहे. अनेक प्रभागांत इच्छुकांमध्ये धोत्रे व पाटील या दोन्ही गटांच्या समर्थकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे तिकीट वाटपच्या वेळी दोन्ही गटांत ओढाताण होऊन गटबाजीला उधाण येण्याची शक्यता आहे. त्यातच काही ज्येष्ठ नगरसेवक विशिष्ट प्रभागांसाठी आग्रही असून, ‘त्या ठिकाणी नरेंद्र मोदी जरी निवडणूक लढले तरी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढू’, अशा जाहीरपणे वल्गना करीत आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय गटातटाच्या राजकारणात पाडापाडीचे राजकारणदेखील खेळल्या जाऊ शकते. अकोला महापालिका निवडणुकीत भाजपला यश मिळण्याची शक्यता असली तरी, अंतर्गत गटातटाचे राजकारण बाजूला सारून भाजपला निवडणुकीला समोरे जावे लागणार आहे.

काँग्रेसकडूनही मोठय़ा प्रमाणात इच्छुक

कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षानेही निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणीवर भर दिला आहे. कॉँग्रेसने इच्छुकांचे अर्ज स्वीकारून मुलाखतीही घेतल्या आहेत. कॉँग्रेसच्या मुलाखतीलाही इच्छुकांनी चांगला प्रतिसाद दिला. राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठीही अनेक जण इच्छुक असून, राष्ट्रवादीतही उमेदवारीसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेनेही स्वबळावर निवडणुकीची तयारी सुरू करून इच्छुकांना अर्जाचे वाटप केले आहे. अकोला महापालिकेत एमआयएम पक्षही धडक देण्याच्या तयारीत आहे. पक्षाकडून १३ प्रभागांची चाचपणी करण्यात येत असून, १० प्रभागात उमेदवार उभे करण्यात येणार असल्याची माहिती एमआयएमच्या नेत्यांनी दिली. निवडणुकीत पक्ष मुस्लीम आणि दलितबहुल भागात उमेदवार उभे करणार आहेत. त्यामुळे भारिप-बमसं व एमआयएममध्ये आघाडी करण्यासंदर्भात दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून चाचपणी सुरू असल्याचीही माहिती आहे. अकोला जिल्हय़ात सक्षम असलेल्या भारिप-बमसंचीही या निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. महापालिकेच्या हद्दवाढीनंतर नव्याने समाविष्ट झालेल्या परिसराचा विकास, धार्मिक स्थळांवरील कारवाई, शहरातील मुलभूत प्रश्न, अतिक्रमण आदी मुद्दय़ांवर निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत.

पक्षांतराचे वारे

महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांमध्ये पक्षांतराचे वारे वाहत असून, नगरसेवकांची पळवापळवी केली जात आहे. याचा सर्वाधिक फटका कॉँग्रेसला बसला. भाजप व राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांचे मोठय़ा प्रमाणात ‘इनकमिंग’ सुरू आहे. कॉँग्रेस व अपक्ष असे १० विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल झाले. शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक नगरसेवक भाजपत तर, भाजपच्या एक नगरसेविका, मनसे व अपक्ष प्रत्येकी एक नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. एका अपक्ष नगरसेविकेने कॉँग्रेसची वाट धरली.

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची पूर्ण तयारी झाली आहे. त्यासाठी विविध समित्यांकडे जबाबदारी देण्यात आली असून नियोजन करण्यात येत आहे. युतीसंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. युती न झाल्यास स्वबळावर लढण्यासाठी भाजप सज्ज आहे.  खा. संजय धोत्रे, मनपा निवडणूक प्रमुख, भाजप.

untitled-10