गेल्या पंधरा वर्षांपासून महापालिकेत सत्तेपासून दूर असलेल्या भाजपला आता अमरावतीत सत्तेचे वेध लागले आहेत. काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्या कार्यकाळातील विकासकामे, रस्ते सुधारणा, भुयारी गटार योजनेच्या कामाला मिळालेली गती, या विकासकामांच्या आधारावर भाजपने प्रचार सुरू केला असला, तरी भाजपसमोर अंतर्गत गटबाजीचे आव्हान आहे. काँग्रेसनेही गेल्या निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत पण, सूर सापडलेला नाही. स्थानिक आघाडय़ांचे अस्तित्व संपुष्टात आल्याने प्रमुख राजकीय पक्षांमध्येच लढत होण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजपला केवळ ८.६४ टक्के मते मिळाली होती. चौथ्या स्थानावरून आता पहिल्या स्थानावर येण्यासाठी भाजपला मोठा पल्ला गाठावा लागणार असला, तरी भाजपने केंद्रात आणि राज्यातील सत्तेचा फायदा घेत संघटनबळ वाढवले आहे. त्याचा प्रभाव निवडणुकीच्या तयारीवर दिसून आला आहे. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री प्रवीण पोटे आणि भाजपचे आमदार डॉ. सुनील देशमुख या दोघांनाही अमरावती महापालिकेवर आपली पकड हवी आहे. दोघांचेही गट कामाला लागले आहेत. अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपचे निवडणूकप्रमुख म्हणून डॉ. सुनील देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निर्णयप्रक्रियेत प्रवीण पोटे यांना महत्त्वाचे स्थान असले, तरी चेहरा डॉ. सुनील देशमुखांचा राहणार आहे, असे स्पष्ट संकेत दिसू लागले आहेत.
डॉ. देशमुखांचा स्वतंत्र गट आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी जनविकास काँग्रेस हा पक्ष स्थापन केला होता. पक्षाचे कोणतेही पद जरी त्यांनी घेतले नव्हते, तरी सहा नगरसेवक निवडून आणण्याची कामगिरी त्यांनी केली होती. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे समर्थकही आपसूकच भाजपमध्ये आले. भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे उमेदवार निवडताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दमछाक होणार आहे.
गटबाजीचा धोका
नगरपालिकांच्या निवडणूक निकालांनी भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. महापालिकेतही अशीच कामगिरी करण्याची आशा स्थानिक पदाधिकाऱ्यांना आहे. या वेळी चित्र बदलून गेले आहे. डॉ. सुनील देशमुख यांना आपल्या समर्थकांसोबतच भाजपमधील विविध गटांतील उमेदवारांना सामावून घेण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. प्रवीण पोटे यांना आगामी काळात स्थानिक स्वराज्य मतदारसंघात निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. महापालिकेतील नगरसेवकही त्यांचे मतदार राहणार असल्याने आपली पसंती ते पुढे रेटताना दिसत आहेत. त्यामुळेच भाजपमध्ये अंतर्गत धुसफुस वाढल्याचे चित्र आहे.
गेल्या निवडणुकीत जनविकास काँग्रेस, जनकल्याण आघाडी, स्वाभिमान काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष यांनी तब्बल २९.३५ टक्के मते मिळवून प्रमुख राजकीय पक्षांची गणिते बिघडवून टाकली होती. या वेळी मात्र ही शक्यता दिसत नाही.
भाजप आणि शिवसेना युती होण्याचे संकेत अद्याप तरी नाहीत. खासदार आनंदराव अडसूळ यांच्या हाती पक्षाची धुरा असली, गटबाजीमुळे त्यांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे. शिवसेनेतील जुन्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी घेत आपले झेंडे पुन्हा बाहेर काढले आहेत. भाजपसोबत त्यांचे फारसे सख्य नाही. नवीन पदाधिकाऱ्यांना अजूनही पकड मजबूत करता आलेली नाही. अशा स्थितीत महापालिका निवडणुकीत अस्तित्व मजबूत करण्याचे आव्हान आनंदराव अडसूळ यांच्या गटासमोर आहे.
काँग्रेसला आता या निवडणुकीत पूर्णपणे नव्याने आखणी करावी लागत आहे. माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. पण ते अजूनही मैदानात उतरल्याचे दिसून आलेले नाही. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांच्यासमोर स्वकीयांचेच आव्हान आहे. पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढतानाच काँग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रचार करण्याची दुहेरी जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. काँग्रेसमधील गटबाजी कमी होण्याची अजूनही चिन्हे दिसत नाहीत. भाजपनंतर इच्छुकांची सर्वाधिक गर्दी काँग्रेसमध्ये असली, तरी प्रचारात अजूनही सुसूत्रता आलेली नाही.
एमआयएमच्या कामगिरीकडे लक्ष
बसप, रिपब्लिकन पक्षाचा आठवले गट, गवई गट, समाजवादी पक्ष, एमआयएम, मुस्लीम लीग यांसारखे पक्षदेखील निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आपआपल्या प्रभावक्षेत्रात प्रमुख राजकीय पक्षांची नाकेबंदी करण्यासाठी त्यांच्याकडून व्यूहरचना आखली जात आहे. बसपचा जनाधार फार मोठा नसला, तरी अनेक प्रभागांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांची गणिते बिघडवण्याची ताकद बसपमध्ये आहे. रिपब्लिकन पक्षाचा गवई गट आणि आठवले गट या वेळी कशी कामगिरी करणार याचे औत्सुक्य आहे. मात्र सर्वाधिक उत्सुकता ही एमआयएमची आहे. जिल्ह्य़ातील दोन नगर परिषदांमध्ये एमआयएमने चमकदार कामगिरी केली आहे. काँग्रेससाठी हा पक्ष डोकेदुखी ठरू शकेल. त्याच वेळी बडनेराचे आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष स्वबळावर लढण्याची चिन्हे आहेत. या पक्षाच्या हालचालींकडेही भाजप आणि काँग्रेसला लक्ष ठेवावे लागणार आहे. २००७ च्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक २३ टक्के, तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला १८ टक्के मते पडली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना हे चारही प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणूक लढले होते. २०१२च्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढून शिवसेनेला १० आणि भाजपला ७ जागांवर समाधान मानावे लागले.
भाजपची निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली आहे. भाजपसाठी अनुकूल अशी वातावरणनिर्मिती झाली आहे. नगरपालिका निवडणुकीत चांगली कामगिरी झाल्याने पक्षात उत्साह आहे. पक्षाचा वचननामा तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. विकासाचा प्रवाह अधिक गतिमान करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. महापालिकेत या वेळी नक्कीच भाजपची सत्ता स्थापन होईल. – डॉ. सुनील देशमुख, आमदार, अमरावती