पश्चिम विदर्भातील ३३ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सजलेला राजकीय पट ‘नोटबंदी’ने विस्कळीत झालेला असतानाच ही निवडणूक सत्ताधारी भाजपसाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे. भाजपच्या आमदारांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे, तर शिवसेनेसाठी सैल झालेली पकड घट्ट करण्याची ही संधी मानली जात आहे. काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वाव असला, तरी भारिप-बमसं, एमआयएम, रिपाइंसारखे पक्ष किती उपद्रवमूल्य दाखवतात, यावर उभय पक्षांची कामगिरी ठरणार आहे.

यवतमाळ जिल्ह्य़ातील पुसद नगरपालिकेच्या निवडणुकीत पश्चिम विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार मनोहर नाईक यांच्या पत्नी अनिता नाईक यांची उमेदवारी, तर अमरावती जिल्ह्य़ातील दर्यापूरमध्ये अकोटचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी भारसाकळे रिंगणात असल्याने या दोन लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. त्यातच दर्यापूरमध्ये नलिनी यांचे दीर सुधाकर भारसाकळे हे काँग्रेसतर्फे लढतीत असल्याने प्रकाश भारसाकळे यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे.

अमरावती जिल्ह्य़ातील आठ नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला समसमान संधी आहे. काही ठिकाणी थेट, तर काही ठिकाणी तिरंगी लढतीचे चित्र आहे. मोर्शी, वरूड आणि शेंदूरजनाघाट या तीन ठिकाणी सत्तेत येण्यासाठी भाजपची धडपड सुरू असली, तरी युवा स्वाभिमान आणि वरूड विकास आघाडीने त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण केले आहेत. धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे नगरपालिकेत भाजप विरुद्ध काँग्रेस ही पारंपरिक राजकीय लढत आहे. मोर्शी नगरपालिकेत युवा स्वाभिमान आणि काँग्रेसची सत्ता होती. या वेळी भाजप, युवा स्वाभिमान, काँग्रेस असा सामना रंगला आहे. वरूडमध्ये भाजप, राष्ट्रवादी, वरूड विकास आघाडी अशी तिरंगी लढत आहे. शेदूरजनाघाटमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि भाजप यांच्यात युद्ध आहे. अचलपूर आणि चांदूर बाजारमध्ये भाजप, प्रहार, शिवसेना आणि काँग्रेस अशी चौरंगी लढत आहे. अंजनगाव सुर्जीत भाजपला अंतर्गत बंडाळीचा सामना करावा लागत आहे.

यवतमाळमध्ये चुरस

यवतमाळ जिल्ह्य़ातील आठ नगरपालिकांपैकी पाच नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी महिलांमध्येच सामना आहे. जातीय समीकरण, पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि प्रचार यावरच निवडणुकीचे गणित आहे. यवतमाळ नगरपालिकेकडे सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. भाजपचे वर्चस्व या ठिकाणी असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुपस्थितीत काँग्रेस, बसप आणि शिवसेनेनेही ताकद पणाला लावली आहे. पुसद पालिकेत राष्ट्रवादीतर्फे आमदार मनोहर नाईक यांच्या पत्नी अनिता नाईक यांच्या विरोधात काँग्रेस आणि भाजप-शिवसेना युती लढतीत आहे. आर्णीमध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप अशी चौरंगी लढत आहे. घाटंजीमध्ये या चार प्रमुख पक्षांसह बसपही रिंगणात आहे. दिग्रसमध्ये बंडखोरांनी रंगत आणली आहे.

अकोला जिल्ह्य़ात एमआयएमचे उपद्रवमूल्य किती याचा अंदाज घेतला जात आहे. पातूर हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. अल्पसंख्याकांची मते निर्णायक ठरत आली आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात तिरंगी लढत आहे. तेल्हारामध्ये भाजपसाठी अस्तित्वाचा संघर्ष आहे. भाजपची सत्ता टिकवण्याची धडपड आहे. तेल्हारा विकास आघाडीने नवे समीकरण तयार केले आहे. बाळापूरमध्ये काँग्रेस, परिवर्तन पॅनेल आणि भारिप-बमसं यांच्यात लढत आहे. मुस्लीमबहुल असलेल्या या गावात एमआयएमने भारिप-बमसंला समर्थन दिले आहे. मूर्तिजापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आले, तरी भाजप, शिवसेना आणि भारिप-बमसं लढतीत आहे. अकोटमध्ये एमआयएमने काँग्रेससमोर अडचणी निर्माण केलेल्या असतानाच भाजपसाठीदेखील आव्हान आहे.

बुलढाणा जिल्ह्य़ात दुसऱ्या पक्षातून येऊनही नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवणारे उमेदवार चर्चेत आहेत. बुलढाण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बमसं, शिवसेना अशी बहुरंगी लढत आहे. देऊळगाव राजामध्येदेखील अशीच स्थिती आहे. चिखलीच्या निवडणुकीत बोंद्रे कुटुंबीयांनी रंगत आणली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपतर्फे बोंद्रे कुटुंबातील सदस्य रिंगणात आहेत. खामगावमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याने भाजपला साथ दिली. राष्ट्रवादीला धक्का बसला, पण त्यानंतर भारिप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपची कोंडी करण्यासाठी आघाडी केली. मलकापूरमध्ये काँग्रेस, भाजप-सेना आघाडीत लढत आहे.

वाशीम जिल्ह्य़ातील वाशीम, मंगरूळपीर आणि कारंजा लाड पालिकेची निवडणूक भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, भारिप-बमसं आणि एमआयएम यांच्यात मुख्य लढत आहे. अपक्ष उमेदवारांनीही पक्षीय उमेदवारांची झोप उडवून दिली आहे

भाजपमध्ये अस्वस्थता

पश्चिम विदर्भातील भाजपच्या स्टार प्रचारकांना गर्दी खेचता आलेली नाही. नोटाबंदीमुळे वातावरण तापले आहे. त्याचा फायदा होतो की तोटा याचे आकलन अजूनही भाजपच्या नेत्यांना झालेले नाही. अशा स्थितीत भाजपसमोर सर्वाधिक डोकेदुखी आहे.

Story img Loader