भाजपाला एकनाथ शिंदे सरकारचं ओझं झालं आहे असं वक्तव्य आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही टीका केली. एवढंच नाही तर शिवसेनेने आम्हाला सर्वोच्च पदावर बसवलं आहे. शिवसेना नसती तर आम्ही कुठे असतो? हा प्रश्न मी कायमच विचारतो. उद्धव ठाकरेंनी जे जोडे पुसण्याचं वक्तव्य केलं ते योग्यच आहे. ठाकरे घराणं आणि शिवसेना ही चार अक्षरं होती म्हणूनच आम्ही इथपर्यंत वाटचाल केली आहे. जोडे पुसण्याचं वक्तव्य कुणाचंही नाव घेऊन केलं नव्हतं. मग लोक आपल्या अंगाला का लावून घेत आहेत? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
“एक नक्कीच आहे की महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाला सध्याच्या सरकारचं ओझं झालं आहे. हे ओझं किती काळ घेऊन फिरायचं खांद्यावर हा प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा मी ऐकतो आहे. अर्थात तो त्यांचा राजकीय प्रश्न आहे.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. माझ्या पत्रकार परिषदेला कुणीही उत्तर देऊ द्या. माझ्यावर कुणीही टीका करावी. देशात स्वातंत्र्य आहे. आपल्याकडे ब्रिटिशांचा कायदा नाही. माझ्यावर माझ्या विरोधकांनी खुशाल टीका करावी माझं काहीही म्हणणं नाही तो त्यांचा अधिकार आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मल्लिकार्जुन खरगेचं समर्थन आणि मोदींना टोला
मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींना विषारी साप म्हटल्याचं मी ऐकलं. पण ते नेमकं काय म्हटले हे मला माहित नाही. मात्र समजा साप म्हटलं असेल तर गैर काय? कारण महाराष्ट्रात सापाची, नागाची पूजा केली जाते. सापाला देव मानलं जातं. साप हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे असं म्हणत मल्लिकार्जुन खरगेंचं समर्थन करत संजय राऊत यांनी मोदींना टोला लगावला आहे.