सोलापूर : सोलापूरसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने संपूर्ण अपयशी कारभार केला असल्यामुळेच निवडणुका घ्यायला महायुती सरकार घाबरत आहे. केवळ तांत्रिक कारण पुढे केले जात आहे. खरोखर हिंमत असेल तर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असे आव्हान काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी दिले आहे. देशात पुन्हा सत्ता मिळण्याची खात्री नसल्यामुळे मोठे कांड घडवून आणण्याची भीती असून सर्वांनी सावध राहण्याचा इशारा त्यांनी दिला.
सोलापूर शहर युवक काँग्रेसच्यावतीने शहरातील विविध पायाभूत प्रश्नांबद्दल जाब विचारण्यासाठी सोलापूर महापालिकेवर दुपारी रणरणत्या उन्हात जनआक्रोश मोर्चा काढला. महापालिकेसमोर या मोर्च्याचे रूपांतर सभेत झाले तेव्हा आमदार प्रणिती शिंदे यांनी आक्रमकपणे भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारसह मोदी सरकारवर हल्लाबोल केला. चार हुतात्मा पुतळ्यांपासून निघालेल्या या जनआक्रोश मोर्च्याचे नेतृत्व आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह,प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, उपाध्यक्ष शिवराज मोरे आदींनी केले. मोर्चेक-यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर नागरी समस्यांचे तोरण बांधून सर्वांचे लक्ष वेधले. महिका कार्यकर्त्यांनी पाणी प्रश्नावर तीव्र संताप व्यक्त करीत रिकाम्या घागरी फोडल्या.
हेही वाचा >>> अजित पवारांचे द्वितीय पुत्र जय पवारही राजकारणात नशीब आजमावणार? म्हणाले “अजित दादांनी…”
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, सोलापुरात महाकाय उजनी धरण आसून आठ-आठ दिवस पिण्यासाठी पाणी मिळत नाही. दुसरीकडे घरात खासगी नळ नसतानाही महापालिकेकडून नळ असल्याचे गृहीत धरून त्याप्रमाणे भरमसाठ पाणी दर आणि कर वसूल करीत आहे. त्यासाठी केंद्राच्या अपयशी ठरलेल्या अमृत योजनेचे निमित्त पुढे करीत आहे. शहरात कोट्यवधींचा निधी खर्च करून स्मार्ट सिटीची झालेली कामे अतिशय नित्कृष्ट दर्जाची आहेत. स्मार्ट सिटीची कामे ही शहराची स्मार्ट वाट लावणारी आहेत. त्याबद्दल जनता पूर्णतः असमाधानी आहे.
आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा सत्ता मिळण्याची खात्री नसल्यामुळे मोदी सरकार आणि भाजपकडून देशात मोठे कांड घडवून आणण्याची भीतीही आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी स्मार्ट सिटीच्या नावाखाली हजारो कोटींचा चुराडा झाला तरी प्रत्यक्षात शहरे स्मार्ट बनली नाहीत, उलट ही शहरे नागरी समस्यांचे आगर बनली आहेत. स्मार्ट सिटीच्या कामांचे लेखापरीक्षण व्हावे आणि ते जाहीर करावे, असे खुले आव्हान भाजप सरकारला दिले. यावेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे, पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, प्रा. अशोक निंबर्गी आदींनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.