राज्यात मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. यावरून विरोधकांकडून भाजपावर जोरदार टीका सुरू आहे. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना(ठाकरे गट) नेते खासदार विनायक राऊत यांनी भाजपा आणि शिंदे सरकारवर टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विनायक राऊत म्हणाले, “दुर्दैवाने कालच शिवसेना नेते संजय राऊत यांना पुन्हा कर्नाटकच्या कोर्टाने नोटीस पाठवली आहे. पाच वर्षांपूर्वी एक सभेत भाषण केलं, त्याचा संदर्भ आता काढला आणि भडकाऊ भाषण दिल्याबद्दल त्यांना समन्स पाठवलेलं आहे. केवळ महाराष्ट्रावर सूड उगवण्याचं काम भाजपाकडून सुरू आहे. त्यातूनच कर्नाटकातील लोकांचे उपद्वाव्याप आता खूप मोठ्याप्रमाणावर वाढत आहेत. शिवसेना मात्र कोणत्याही परिस्थितीत गप्प बसणार नाही. कर्नाटकची नाकेबंदी करण्याची जबरदस्त ताकद शिवसेनेत आहे, वेळ पडली तर तेही केल्याशिवाय राहणार नाही.”

हेही वाचा – महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचं काम शिंदे सरकारच्या माध्यामातून भाजपा करत आहे – विनायक राऊत

याशिवाय “पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांची मुक्तता करत असताना, ईडीवर ज्या पद्धतीने ताशेरे ओढलेले आहेत. त्याचा सूड उगवण्यासाठी पुन्हा एकदा संजय राऊत यांना तुरुंगात टाकण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या भाजपाकडून आखल्या जात आहेत.” असा आरोपही विनायक राऊत यांनी भाजपावर यावेळी केला.

चार महिन्यांपूर्वी शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांना अटक करण्यात आली. त्यानंतर १०० दिवसाने संजय राऊत जेलमधून बाहेर आले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

कर्नाटकमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयाने समन्स बजावलं आहे. बेळगाव न्यायालयात १ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश राऊत यांना देण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp is only working to take revenge on maharashtra vinayak raut msr