एकनाथ शिंदे आणि त्यांच्या फुटलेल्या गटाला शिवसेना या पक्षावर आणि चिन्हावर दावा करायला लावला. पक्ष आणि चिन्हावर दावा करण्याचा दावा फुटलेल्या लोकांच्या डोक्यात नव्हता. हे डोकं दिल्लीच्या भाजपावाल्याचं आहे. महाराष्ट्रातून त्यांना शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव मिटवायचं आहे. तीच पद्धत राष्ट्रवादीच्या बाबतीत त्यांनी अवलंबली असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपा म्हणजे सीरियल किलर आणि रेपिस्ट

राष्ट्रवादी फुटली, पण त्याचवेळी त्यांनी प्रमुख लोकांना हाताशी धरून आम्हीच राष्ट्रवादी आहोत हा दावा करायला लावला. एखादा सीरियल किलर असतो त्याची मोडस ऑपरेंडी असते. सीरियल रेपिस्ट असतात. तसे भाजपा म्हणजे राजकारणातले सीरियल रेपिस्ट आणि सीरियल किलर आहेत. पक्ष एका विशिष्ट आकड्यांमध्ये फोडायचा आणि फुटलेल्या गटाला पक्षावर आणि चिन्हावर दावा करायला लावायचा हे यांचं धोरण आहे. महाराष्ट्रातून बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नष्ट करायचं. त्यानंतर शरद पवारांचं नाव नष्ट करायचं. स्वतः काहीच करायचं नाही. जे स्वतः काही करत नाहीत ते अशा गोष्टी करतात असाही आरोप संजय राऊत यांनी केला.

महाराष्ट्रातून बाळासाहेब ठाकरेंचा इतिहास पुसला जाणार नाही

इतर राज्यांमध्ये भाजपाचे हेच प्रयत्न सुरु आहेत. कितीही प्रयत्न केले तरी महाराष्ट्रातून इतिहास पुसला जाणार नाही. कायदेशीर लढाईचा विचार केला तर शिवसेनेने कायदेशीर लढाई जिंकली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार महाराष्ट्रातल्या फुटलेल्या आमदारांना अपात्र ठरवलं जाईल. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आहेत. तोच निकाल राष्ट्रवादीच्या फुटलेल्या गटालाही लागू पडू शकतो याची मला १०० टक्के खात्री आहे. विधीमंडळ पक्षातली फूट ही पक्षातली फूट नाही. हे धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं आहे.

कुणीही काहीही राजकारण केलं तरी राष्ट्रवादी तिच्या जागेवर आणि शिवसेना तिच्या जागेवर जाईल. ऑपरेशन लोटस वगैरे काही नाही मला तर वाटतंय की भाजपाचंच ऑपरेशन झालं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पाडल्याने भाजपाचं देशात वस्त्रहरण झालं आहे आणि त्यांची वैचारिक सुंता झाली आहे हे दिसतं आहे. अशीही टीका संजय राऊत यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp is serial rapist and serial killer in politics said sanjay raut scj