शिवशक्ती आणि भिमशक्तीच्या युतीची घोषणा अलीकडेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल प्रकाश आंबेडकरांनी वक्तव्य केलं आहे. तर, आंबेडकरांच्या विधानाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावरून भाजपाने उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी अंमलबजावणी संचनालय ( ईडी ), केंद्रीय अन्वेषण विभाग ( सीबीआय ) आणि आयकर विभाग ( आयटी ) यांचा गैरवापर करत आहेत, असं वाटत नाही. त्यांच्या जागी मी असतो, तरी तेच केलं असतं. कोणाही सत्ता राखण्यासाठी जे करतो, तेच नरेंद्र मोदी करत आहेत,” असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचा : वंचित बहुजन आघाडी भाजपाची ‘बी’ टीम? चंद्रकांत पाटील हसत म्हणाले…
शरद पवार काय म्हणाले?
तर, प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल केलेल्या विधानाबाबत शरद पवार यांना विचारण्यात आलं. तेव्हा शरद पवार म्हणाले, “अलीकडे आम्ही पाहतोय की, तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात येतोय,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावरून भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी ट्वीट केलं आहे.
हेही वाचा : वंचितसोबतच्या आघाडीबाबत शरद पवार यांचे मोठं वक्तव्य; म्हणाले, “आम्ही त्याची चर्चा…”
ट्वीट करत केशव उपाध्ये म्हणाले की, “शरद पवार म्हणातायत तपास यंत्रणांद्वारे विरोधकांना त्रास दिला जातोय. प्रकाश आंबेडकर म्हणतायत मोदी तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाही. या विरोधाभासी वक्तव्यांमध्ये उद्धव ठाकरे कोणाची बाजू घेणार? न घरका ना घाटका अशी परिस्थिती होणार,” असा टोमणा उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना मारला आहे.