राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुढील १५ वर्षात अखंड भारत होईल आणि आपल्या सर्वांना तो पहायला मिळेल असं विधान केलं आहे. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी १५ वर्ष नाही तर १५ दिवसांत करा अशी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांच्या या टीकेला भाजपाने उत्तर दिलं असून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर केलेले वक्तव्याची आठवण करुन दिली आहे.

मोहन भागवत काय म्हणाले –

मोहन भागवत यांनी पुढील १५ वर्षात अखंड भारताची कल्पना मांडताना म्हटलं की, “हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे. पुढील १५ वर्षात पुन्हा एकदा अखंड भारत पहायला मिळेल. आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो, मात्र पुरस्कार हातात दंडुके घेऊनच होईल. आमच्या मनात द्वेष नाही, पण जग शक्तीला मानतं मग काय करणार?”.

मोहन भागवतांच्या ‘अखंड भारत’ विधानाला संजय राऊतांचा पाठिंबा; म्हणाले “१५ वर्ष नाही, १५ दिवसात…”

“सनातन धर्माचा विरोध करणाऱ्यांचंही आम्हाला सहकार्य आहे. जर त्यांनी विरोध करत आवाज उठवला नसता तर हिंदू जागा झाला नसता आणि झोपूनच राहिला असता,” असं मोहन भागवत यांनी यावेळी म्हटलं. धर्माचं उत्थान होईल तरच भारताचं उत्थान होईल आणि याला विरोध करणारे संपतील असंही ते म्हणाले आहेत. मोहन भागवत यांच्या हरिद्वार दौऱ्यात काही संतांनी त्यांच्याकडे देशाला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली.

संजय राऊतांची प्रतिक्रिया –

“अखंड हिंदुस्थानाचं कोणाचं स्वप्न असेल तर आम्ही स्वागत करतो. कोणताही पक्ष त्याला विरोध करणार नाही. २०१४, २०१९ मध्ये भाजपाने याच मुद्द्यावर मतं मागितली. १५ वर्ष नाही तर १५ दिवसात करा, पण आधी पाकव्याप्त काश्मीर आणि नंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान ताब्यात घ्या आणि अखंड हिंदुस्थान निर्माण करा. तुम्हाला कोणी थांबवलेलं नाही. पण त्याआधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या. कारण अखंड हिंदुस्थान त्यांचं स्वप्न होतं. बाळासाहेबांचंही स्वप्न होतं. तुम्ही सावरकर आणि बाळासाहेब यांचे आभार माना कारण त्यांनी ही संकल्पना रुजवली,” असं संजय राऊत म्हणाले.

“पुढील १५ वर्षात अखंड भारत पहायला मिळेल”, मोहन भागवत यांचं विधान; म्हणाले “जग फक्त शक्तीला मानत असेल तर…”

भाजपाने करुन दिली आठवण

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एकामागोमाग ट्वीट करत संजय राऊतांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. “सरसंघचालक मोहन भागवतजी, यांनी आपण प्रयत्न केल्यास १०-१५ वर्षात अखंड भारताचं स्वप्न साकार होईल असं विधान केले. त्यावर भाजपाची कावीळ झालेले संजय राऊत यांनी १५ वर्ष नव्हे तर १५ दिवसांत अखंड हिंदुस्तानचं स्वप्न साकार करू असं वचन द्या असं विधान केले. अहो राऊतसाहेब सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्व सोडलेच आहे हे वारंवार सिद्ध का करताय? २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींसारखे कणखर नेतृत्व लाभलं तर देश कराचीतही भगवा फडकवेल असं विधान तुम्ही जाहीर व्यासपीठावरून केले होते,” अशी आठवण केशव उपाध्ये यांनी करुन दिली आहे.

“मोदींच्या नावावर मतं मागून शिवसेनेने १८ खासदार निवडून आले. विधानसभेतही मोदी नावाचा जप राऊत करतच होते. परंतु सत्तेसाठी भ्रष्ट्रवादींसोबत आघाडी करावी लागली,” अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

“बरं ते अखंड भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. तुम्ही सत्ता टिकवण्याचं बघा आणि हो २०२४ च्या लोकसभेत शिवसेनेचे किमान खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. नाहीतर तुमचीही गत साडे तीन जिल्ह्याच्या नेत्याप्रमाणेच व्हायची,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.

Story img Loader