भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा चांगलाच गाजला आहे. किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. याच निमित्ताने किरीट सोमय्या कोल्हापुरला जात असताना सुरुवातीला त्यांना सीएसएमटी रेल्वे स्थानकावर रोखण्यात आलं आणि त्यानंतर कराडमध्ये रोखत ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान किरीट सोमय्यांच्या दौऱ्यामुळे कराडमध्ये रात्रभर हायव्होल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. किरीट सोमय्या यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुंबई पोलिसांसह, उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.

कोणताही कायदा, आदेश नसताना मला डांबून का ठेवण्यात आलं? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला असून मी हायकोर्टात जाणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच मुंबईचे पोलीस आयुक्त तुम्ही जनतेचे सेवक आहात उद्धव ठाकरेंचे नाहीत. गुंड बनून माफियागिरी करु नका असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

“अजित पवार, उद्धव ठाकरे घोटाळा करणार आणि नंतर आम्हाला तुमच्या जीवाला धोका आहे सांगत पोलीस थांबवणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांचा बंदोबस्त करायचा की जो जनतेसाठी संघर्ष करत आहे त्याला कोंडून ठेवणार? कोणापासून धोका आहे त्यांची नावं जाहीर करावीत,” अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

भावना गवळी यांच्या गुडांनीही दगडफेक करत माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. सरकार जीव घेण्यासाठी आहे का? असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरेंच्या सरकारमधील घोटाळेबाजांना जेलमध्ये टाकणार असा इशारा किरीट सोमय्यांनी दिला आहे.

किरीट सोमय्या सध्या कराडमध्येच थांबले असून तिथूनच मुंबईला परतणार आहेत. दरम्यान याआधी त्यांची पत्रकार परिषद पार पडणार असून यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणार असा इशारा दिला आहे.

कोल्हापुरात जमावबंदी

दरम्यान कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. याआधी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले होते. सोमय्यांच्या जीवाला धोका आणि त्यांची भेट पाहता कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने कलम १४४ अंतर्गत जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आल्याचे त्यात म्हटले होते.

Story img Loader