भाजपा नेते किरीट सोमय्या आज (२३ फेब्रुवारी) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सोमय्यांनी कोल्हापूरमध्ये पोहचताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला. “हसन मुश्रीफ यांचा घोटाळा १५८ कोटी रुपयांचा दिसत होता. मात्र, हा घोटाळा वास्तवात ५०० कोटी रुपयांहून अधिक आहे,” असा गंभीर आरोप सोमय्यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किरीट सोमय्या म्हणाले, “हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना लुटण्यासाठी बँकेलाही सोडलं नाही. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि घोरपडे सहकारी साखर कारखान्यालाही लुटण्यात आलं. आता त्यांची सर्व बाजूने चौकशी सुरू आहे. या कारवाईची माहिती घेण्यासाठी आणि पाठपुरावा करण्यासाठी मी आज बँकेला भेट देणार आहे.”

“मी गरीब शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचीही पर्वा करणार नाही,” असंही सोमय्यांनी नमूद केलं.

व्हिडीओ पाहा :

दरम्यान, किरीट सोमय्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यात आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाणार आहेत. तर, मुश्रीफ यांनी संघर्ष न करता सोमय्या यांच्या स्वागताची भूमिका घेतली.

हेही वाचा : “आता नंबर कुणाचा?” अनिल परब, हसन मुश्रीफ, संजय राऊतांचा उल्लेख करत किरीट सोमय्यांचं सूचक विधान!

गेल्या काही दिवसांपासून सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला चुकीच्या पद्धतीने पैसे पुरवल्याचा, तसेच जिल्हा बँकेतून गडहिंग्लज कारखाना चालवण्यास घेतलेल्या ‘ब्रिक्स’ कंपनीला केलेला अर्थपुरवठाही वादग्रस्त असल्याचा आरोप केला आहे. त्यावर मुश्रीफ यांच्यासह त्यांचे नातेवाईक, त्यांचा घोरपडे कारखाना, जिल्हा बँकेवर ईडीने छापेमारी केली होती.

अधिकारी, शेतकरी भेट

सोमय्या आज सहकार सहनिबंधक अरुण काकडे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, शेतकरी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर सोमय्या माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

संघर्ष ऐवजी स्वागत

ईडीच्या कारवाईवेळी कागल येथे मुश्रीफ कार्यकर्त्यांनी तर जिल्हा बँकेत कर्मचाऱ्यांनी विरोध केला होता. तथापि, कोल्हापूर जिल्हा बँकेत किरीट सोमय्या यांचे स्वागत असल्याची प्रतिक्रिया आज बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. किरीट सोमय्या गुरुवारी कोल्हापूर जिल्हा बँकेच्या केंद्र कार्यालयाला भेट देणार असल्याचे समजले. बँकेमध्ये त्यांचे स्वागतच आहे. मी त्यांना बँकेत येवून जी माहिती हवी असेल ती घ्या, असे आवाहन यापूर्वीच केले होते. कदाचित; त्यानुसार ते येत असावेत. प्रशासकाची कारकीर्द संपल्यानंतर बँकेने गेल्या आठ वर्षांत प्रगती केलेली आहे. विविध पक्षांचे प्रतिनिधी असलेले संचालक मंडळ एकमताने, विश्वासाने काम करीत आहेत. ३१ डिसेंबर २०२२ अखेर बँकेला १०५ कोटी नफा झालेला आहे. कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp kirit somaiya serious allegations of corruption on ncp hasan mushrif pbs