राज्यात सध्या सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सत्ता आल्यापासून महाविकास आघाडीवर आणि शिवसेनेवर टीका करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सरकारवर टीका केली आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील माफियाराज सरकारचा अंत जवळ आला आहे, असं म्हणत राज्य सरकारला इशारा दिला आहे.
“मी उद्धव ठाकरेंना सांगेन, तुम्ही…”
“आम्हाला धमक्या देत आहेत. हे माफिया सरकार आणि त्यांचे मुख्यमंत्री आणि त्यांचे प्रवक्ते किरीट सोमय्याला धमक्या देत आहेत. मी उद्धव ठाकरेंना निरोप देतो. उद्धव ठाकरे साहेब, आपण मला तोतरा म्हणा, बोबड्या म्हणा, टमरेल म्हणा. आपले प्रवक्ते संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना भ** म्हणावं, चु** म्हणावं. पण हिशोब तर द्यावाच लागणार. उद्धव ठाकरे साहेब, १९ बंगल्यांचा हिशोब घेतल्याशिवाय किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाही”, असं किरीट सोमय्या म्हणाले.
“पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी ८९७ कोटींचा घोटाळा केला”
“२८ नोव्हेंबर २०२१ला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि २९ नोव्हेंबरला दहिसरमध्ये २ कोटी ५५ लाखात अल्पेश अजमेरा बिल्डरने जी जागा विकत घेतली होती, ती उद्धव ठाकरे सरकारने ९०० कोटीत विकत घेतली. म्हणजे पहिल्याच दिवशी या मुख्यमंत्र्यांनी अडीच कोटीचे ९०० कोटी दिले. म्हणजे ८९७ कोटी ५० लाखांचा अजमेरा बिल्डरला फायदा करून दिला. आधे इथर और आधे बंगलेपर”, असा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावरून टोला
उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनावर पदाधिकाऱ्यांशी बोलताना बंडखोर आमदारांना उद्देशून “हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मत मागा”, असं म्हटलं होतं. त्या विधानावरून देखील किरीट सोमय्यांनी खोचक टीका केली आहे. “सध्या काय सांगतायत, बापाचं नाव? आपले सुपुत्र आदित्य ठाकरेंनी नंदकिशोर चतुर्वेदी या हवाला ऑपरेटरकडून किती कोटी रुपयांची एंट्री घेतली आहे? ७ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार मी दिली आहे”, असं ते म्हणाले. “उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरची कोट्यावधींची बेनामी संपती जप्त झाली आहे. उद्धव ठाकरेंनी चार वेळा किरीट सोमय्याची सुपारी देऊन गुंडांना पाठवलं होतं. ठाकरे सरकारने मनसुख हिरेनची सुपारी देऊन हत्या केली”, असा आरोप सोमय्यांनी केला.
“महाराष्ट्राच्या माफिया सरकारचा अंत जवळ आला आहे. मुंबई महापालिकेचं माफियाराज मुंबईकर संपवणार आहे”, असं देखील ते म्हणाले.