भ्रष्टाचाराने बरबटलेली कोल्हापूर महापालिका बरखास्त करावी अशी मागणी करत शहर भाजपाच्या वतीने रविवारी रंकाळा तलावातील राजघाट येथे महापालिकेची प्रतीकात्मक इमारत विसर्जित करण्यात आली. लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांच्या लाचखोरीने कोल्हापूर शहराची बदनामी झाल्याने त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
कोल्हापूर महापालिकेला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. राजर्षी शाहूंच्या करवीर नगरीला महापौर तृप्ती माळवी यांच्या लाचखोरीने काळीमा फासली आहे. तर, विरोधी पक्ष नेते व प्रमुख कारभारी मुरलीधर जाधव हे क्रिकेटच्या बेटींगच्या गुन्हयात अडकले आहेत. या दोघांनाही अटक होणार आहे. या सर्व प्रकारामुळे कोल्हापूर शहराचे नाव बदनाम होत असल्याने शहर भाजपाच्या वतीने रविवारी अनोखे आंदोलन करण्यात आले.
रंकाळा तलावातील राज घाट येथे भाजपाचे कार्यकत्रे मोठय़ा संख्येने जमले. जिल्हाध्यक्ष महेश जाधव, सरचिटणीस संतोष भिवटे, उपाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सदस्य अॅड. संपतराव पोवार, मारुती भागोजी, श्रीकांत घुंटे, मधुमती पावनगरकर, भारती जोशी, सुनीता सूर्यवंशी, रेखा वालावलकर, रजनी बुरखे, सोनाली माने, आदींसह कार्यकत्रे व पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. महापालिका बरखास्त करा, लाच घेणाऱ्या महापौर तृप्ती माळवींचा धिक्कार असो अशा घोषणा देत महापालिकेची प्रतीकात्मक प्रतिकृती रंकाळा तलावात बुडवली. ती प्रतिकृती रंकाळा प्रदूषित होऊ नये म्हणून बुडवून बाहेर काढली.
या वेळी नगरसेवक आर.डी.पाटील यांनी, महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा राजरोस भ्रष्टाचार चालतो. सर्व नगरसेवक तुटपुंज्या पशासाठी महापालिका बदनाम करीत आहेत, असे नमूद करून कोल्हापूर महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी केली. तर, सरचिटणीस अशोक देसाई यांनी जनहितासाठी निवडून आलेले पदाधिकारी भ्रष्टाचारात गुंतल्याने त्यांना पदावरून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी केली.
कोल्हापूर महापालिका बरखास्त करण्याची भाजपाची मागणी
कोल्हापूर महापालिकेला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. राजर्षी शाहूंच्या करवीर नगरीला महापौर तृप्ती माळवी यांच्या लाचखोरीने काळीमा फासली आहे.
First published on: 02-02-2015 at 01:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp kmc bribe trupti malvi