राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यासहीत सक्रीय झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात भाष्य करतानाच जयंत पाटील यांनी मनसे आणि भाजपा जवळीक या विषयावरही रोकठोकपणे आपलं मत नोंदवत राज ठाकरेंच्या पक्षावर टीका केलीय. आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा सुरू होत असून दौर्यावर जाण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी माध्यमांनी त्यांच्या बंगल्यावर संवाद साधला.
नक्की वाचा >> “आज शरद पवार मुख्यमंत्री असते तर…”; शरद पवार स्टेजवर असतानाच यशोमती ठाकूर यांचं मोठं विधान
…म्हणून मनसेचा वापर सुरु आहे
“मुंबईमध्ये मनसेला जवळ केल्यावर भाजपाला किती मोठा फटका बसू शकतो याचा अंदाज त्यांना आला आहे. त्यामुळेच सध्या भाजपाकडून मनसेचा फक्त वापर चालू आहे,” असा टोला जयंत पाटील यांनी लगावलाय.
…पण अजून त्यांनी धाडस केलेलं नाही
“मनसेची मते तशीही भाजपला मिळणार नाही म्हणून मनसेच्या जवळ जायला भाजपा घाबरत आहे. भाजपाची मनसेला जवळ करण्याची पूर्वीपासूनची इच्छा फार आहे पण अजून त्यांनी ते धाडस केलेले नाही,” असेही जयंत पाटील म्हणालेत.
आंदोलनामागे कोण शोधण्याची गरज…
एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरासमोर केलेल्या आंदोलनाला खतपाणी कुणी घातले… त्या आंदोलनात प्रक्षोभक भाषणे कुणी केली… न्यायालयाच्या निर्णयानंतर पेढे वाटणारे कोण होते… याचा शोध घेण्याची आवश्यकता व्यक्त करतानाच या प्रकरणाचा गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील सक्षमपणे तपास करून कडक कारवाई करतील अशी खात्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
नक्की वाचा >> ‘आज शरद पवार मुख्यमंत्री असते तर..’ म्हणणाऱ्या यशोमती ठाकूर यांना शिवसेनेचं उत्तर; म्हणाले, “यशोमतीताई तुम्ही…”
भ्याड हल्ला निंदनीय…
शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील अगदी खोलात जाऊन माहिती घेत असून योग्य ती कारवाई करत आहेत. या प्रकरणाचा तपास कोणत्या स्टेजला आला आहे याचा नक्की तपशील माहीत नाही असेही जयंत पाटील म्हणाले. शरद पवारांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा प्रकार निंदनीय आहे. त्यामुळे हा प्रकार घडवण्यामागे कोण होते हे शोधण्याची गरज आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
नक्की वाचा >> वसंत मोरे झाले मावळा तर साईनाथ बाबर छत्रपती शिवाजी महाराज; मनसे नेत्याचं ‘ते’ WhatsApp Status चर्चेत
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अजून बराच अवकाश असला तरी सध्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकारणाला वेग आलाय. मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजपा अशी थेट लढत होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. याच पार्श्वभूमीवर मनसेचा वापर भाजपाकडून सुरु असल्याची टीका जयंत पाटलांनी केलीय.