राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या ४० आमदारांच्या सह्या घेतल्या असून ते भाजपाच्या वाटेवर आहेत, असंही म्हटलं जात आहे. पण अजित पवारांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सत्तांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. असं असताना आता आशिष शेलारांनी अजित पवारांच्या नाराजीवर आणि महाराष्ट्राच्या सत्तांतरावर प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीत अमित शाहांबरोबर महाराष्ट्राच्या सत्तांतरावर काय चर्चा झाली? ते मी उघड करू शकत नाही, असं विधान आशिष शेलार यांनी केलं. शेलारांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तर्क-वितर्क लावले जात आहेत.
हेही वाचा- “एकच वादा…”; अजित पवारांची नाराजी ही राष्ट्रवादीची नियोजित खेळी होती? NCP च्या आमदाराचं मोठं विधान!
अजित पवार भाजपाबरोबर येतील, असं वाटतंय का? असं विचारलं असता आशिष शेलार म्हणाले, “मला वाटतं की, याबाबत अजित पवारांनी भूमिका स्पष्ट करायला हवी. त्यामुळे असा प्रश्न भाजपाला विचारणं चुकीचं आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काय सुरू आहे? हे त्यांनाच माहीत आहे. अजित पवारांना काय निर्णय घ्यायचाय, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर महाराष्ट्रात राज्य करतंय. जनतेची सेवा करतंय. सरकार खंबीर आहे.”
हेही वाचा- “अमित शाह, एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी १३ लोकांची हत्या केली”
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलारांनी अलीकडेच दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील सत्तांतराबद्दल काही चर्चा झाली का? असं विचारलं असता आशिष शेलार म्हणाले, “केंद्रीय स्तरावर जर काही चर्चा असेल, तर ती सार्वजनिक करण्याचा विषयच येत नाही. तो मला अधिकारही नाही. पण राजकारणात काहीही घडू शकतं.” आशिष शेलार यांनी ‘टीव्ही ९ मराठी”शी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.