भाजपाचे नेते आणि राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे अमरावती हिंसाचारावर केलेल्या एका ट्वीटवर ट्रोल झाले आहेत. या ट्वीटवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त करत अनिल बोंडे यांना धारेवर धरलं. तसेच तुम्ही तुमच्या मुलाला अमेरिकेत पाठवलं आणि इथल्या तरुणांची माथी भडकवत आहात, असा आरोप युजर्सने केला. तुमचा मुलगा परदेशात शिकायला आणि दंगलीच्या केसेस घ्यायला बिचारे सामान्य गरीब कार्यकर्ते, असंही मत काहींनी व्यक्त केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका युजरने म्हटलं, “जो खरा हिंदू आहे त्याला कोणत्या अनिल बोंडेंची गरज नाही. हिंदू धर्म कधी धोक्यात आलाय हे तर भाजपाने सांगूच नये. ‘ हिंदू खत्रे में है ‘ बोलून लोकांची डोकी फोडून राजकारण करणं म्हणजे भाजपाचं हिंदूत्व. भाजपाचं हिंदुत्व भाजपाला आणि त्यांच्या माणसांना लाभो.”

“दंगलीच्या केसेस घ्यायला बिचारे सामान्य गरीब कार्यकर्ते”

“अनिल बोंडे यांचा मुलगा परदेशात शिकायला आणि दंगलीच्या केसेस घ्यायला बिचारे सामान्य गरीब कार्यकर्ते,” असं म्हणत एका युजरने अनिल बोंडे यांच्यावर प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या स्टाईलमध्ये टीका केली.

एका युजरने अनिल बोंडे यांना थेट प्रश्न विचारला, “डॉ. कुणाल रस्त्यांवर दुसर्‍यांची दुकाने जाळायला आणि केसेस अंगावर घ्यायला कधी येणार आहे?”

“खरी गरज बेरोजगारी, महागाई विरोधात लढण्याची”

“तुमच्या पोराबाळांसाठी सात पिढ्या पुरतील एवढी संपत्ती करुन ठेवा. हाय-फाय शाळांमध्ये शिकवा. परदेशात पाठवा आणि लोकांच्या पोरांच्या अंगावर पोलीस केसेस घ्यायला लावा. वारे राजकारण. पाच वर्षे कृषीमंत्री असताना गरीब शेतकऱ्याच्या पोरांचं कल्याण होईल असं काही काम केलं असतं तर बरं वाटलं असतं. सत्ता गेल्यामुळे आलेल्या अस्वस्थतेतून समाजा-समाजात भांडणं लावणार, गरीबाच्या पोरांना केसेस अंगावर घ्यायला लावणार, स्वतःची राजकीय पोळी भाजणार आणि सत्ता आली का मग फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचं विचार करणार. साहेब, आज खरी गरज बेरोजगारी, महागाई विरोधात लढण्याची आहे, जाती धर्मात नाही,” असं मत एका युजरने मांडलं.

एका युजरने दोन्ही धर्मातील कट्टरतवाद्यांवरच हल्लाबोल केला. ते म्हणाले, “हिंदु असो का मुस्लीम दोन्हीकडचे धर्मांध एक दुसऱ्याच्या कार्बन कॉपी आहेत. त्यांच्या दंगलखोर वागण्यात सामान्य जनता भरडली जाते. पण या दोन्हीकडच्या चिथावणीखोरांची राजकीय आणि धार्मिक दुकानं मात्र सुरू राहतात. म्हणूनच या दोन्हीकडच्या धर्मांधांना नाकारा, प्रेम शांतीचा मार्ग स्वीकारा.”

“जबाबदार लोकनेत्याची भूमिका समाजात शांतता व सामाजिक ऐक्य राखणं”

“अनिलराव बोंडे घरात बसून लोकांना भडकावणे सोप्पं असतं. एक जबाबदार लोकनेत्याची भूमिका समाजात शांतता राहणे व सामाजिक ऐक्य राहण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. स्वतःची पोर तुम्ही परदेशात पाठवली आणि इथल्या पोरांना घरात बसून हुसकवताय ही तुमच्या डोक्याची स्वार्थी विचारधारा आहे,” अशीही टीका अनिल बोंडे यांच्यावर झाली.

सोशल मीडिया युजरने अनिल बोंडे यांच्या एका जुन्या ट्वीटचा आधार घेऊन टीका केलीय. यात ट्वीटमध्ये स्वतः अनिल बोंडे यांनीच त्यांच्या मुलाचा अमेरिकेत विवाह झाल्याचं सांगितलंय.

याशिवाय अनेक युजर्सने अनिल बोंडे यांच्या या ट्वीटवर प्रतिक्रिया व्यक्त करत आपला संताप व्यक्त केला आहे. यापैकीच काही प्रातिनिधिक ट्वीट्स खालीलप्रमाणे,

काही जणांनी अनिल बोंडे यांच्या वक्तव्याचं समर्थन देखील केलंय.

अनिल बोंडे नेमकं काय म्हणाले?

अनिल बोंडे म्हणाले, “मलिक साहेब, हिंदुंना एकत्र करण्यासाठी दारुच्या पैशांची गरज पडत नाही. हर्बल गांजाची तर अजिबात नाही.”

“नवाब मलिक बेताल व्यक्ती आहे. त्यांनी माझ्यावर जे आरोप लावले त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे नाही तर मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. त्यांना अमरावती येथील कोर्टात मी खेचणार आहे. अमरावती येथील दुखावलेले नागरिक त्यांचे तंगडे त्यांच्याच गळ्यात टाकणार आहेत,” असंही त्यांनी आपल्या अन्य एका ट्वीटमध्ये सांगितलं.

ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत अनिल बोंडे म्हणाले, “पहाटे ५ वाजल्यापासून माझ्या घराबाहेर २०० पोलिसांनी गराडा टाकला. सकाळी ६ वाजता मला अटक केली. माझ्यासोबत भाजपाच्या १३ कार्यकर्त्यांनाही सर्च ऑपरेशन करून आणलं गेलं. अमरावतीच्या न्यायालयाने आम्हा सर्वांना जामिनावर मुक्त केलं. परंतु नवाब मलिकांसारखा बेताल वक्तव्य करणारा माणूस दारू आणि पैशांचे आरोप करत आहे.”

हेही वाचा : VIDEO: “काय तमाशा लावलाय, तुमचे हे धंदे बंद करा”, अमरावतीत माजी कृषी मंत्री अनिल बोंडे आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक

“१२ नोव्हेंबरला मुस्लिमांनी दंगली भडकावली. दुकाने फोडण्यात आली, नासधुस करण्यात आली. जीविताचीही हानी करण्यात आली, मारहाण करण्यात आली. त्यावर संतप्त प्रतिक्रिया भाजपाच्या मोर्चातून शांततामय मार्गाने बाहेर पडली. परंतु काही मुस्लीम लोकांनी तलवारी काढल्या आणि दगडफेक केली,” असा आरोप अनिल बोंडे यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader anil bonde get trolled on twitter by social media users over amravati violence tweet pbs