Ashish Shelar News : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. अत्यंत गंभीर अशा स्वरुपाचे हे आरोप आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्रं तयार होती, तुम्ही त्यावर सही करा तसं केलं तर तुमच्यावर ईडी कारवाई होणार नाही, तसंच तुरुंगात जावं लागणार नाही असं सांगण्यात आलं होतं. मी सही केली नाही म्हणून मला १३ महिने तुरुंगात जावं लागलं असंही अनिल देशमुख म्हणाले. आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर हे आरोप करणाऱ्या अनिल देशमुखांना आशिष शेलारांनी ( Ashish Shelar ) चार प्रश्न विचारले आहेत.

अनिल देशमुख यांनी काय म्हटलं?

“तीन वर्षांपूर्वी प्रतिज्ञापत्र करून खोटे आरोप आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरेंवर करण्यास मला सांगण्यात आलं. मी त्याला नकार दिल्यामुळे माझ्यावर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली”, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत. “तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा अत्यंत जवळचा माणूस माझ्याकडे पाठवला. त्याने माझं देवेंद्र फडणवीसांशी अनेकदा बोलणं करून दिलं. त्यांनी माझ्याकडे एक लिफाफा पाठवला. त्यातल्या चार मुद्द्यांचं प्रतिज्ञापत्र करून देण्यास मला सांगण्यात आलं. ते जर मी करून दिलं असतं तर तेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार हे अडचणीत आले असते”, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.

हे पण वाचा- Shyam Manav: “..तर अनिल देशमुख यांनी आत्महत्या केली असती, त्यांनी…”, श्याम मानव यांचा दावा

चार प्रतिज्ञापत्रांमध्ये काय होतं?

१) उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांनी मातोश्रीवर अनिल देशमुखांना बोलवलं त्यांना पैसे गोळा करायला सांगितले या प्रतिज्ञापत्रावर सही करा.

२) दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात हा उल्लेख होता की आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. हा उल्लेख असलेल्या प्रतिज्ञापत्रावर सही मागितली.

३) तिसरं प्रतिज्ञापत्र अनिल परब यांच्याबाबत होतं, त्यांनी काही बेकायदेशीर बांधकामं आहेत त्या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र आहे त्यावर सही करा.

४) चौथ्या प्रतिज्ञापत्रात अजित पवारांचा उल्लेख होता. अजित पवारांनी देवगिरी बंगल्यावर बोलवलं. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार उपस्थित होते. त्या दोघांच्या उपस्थितीत तुम्हाला (अनिल देशमुख) सांगण्यात आलं आहे की गुटखा विक्री करणाऱ्यांकडून इतके पैसे गोळा करायला सांगितलं आहे. अशा पद्धतीचं चौथं प्रतिज्ञा पत्र होतं. ही माहिती श्याम मानव यांनी दिली.

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत विचारले चार प्रश्न

या सगळ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरही दिलं आहे. तसंच आता आज आशिष शेलार यांनी चार प्रश्न विचारत त्याची उत्तर द्या असं आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी म्हटलं आहे. दबावाच्या राजकारणाची भाषा अनिल देशमुख करणार असतील तर काही थेट सवाल आहेत असं आशिष शेलार ( Ashish Shelar ) म्हणाले.

काय आहेत आशिष शेलारांचे प्रश्न? (What Ashish Shelar Asks to Anil Deshmukh? )

१. सचिन वाझे यांना पुन्हा पोलिस दलात घेण्यासाठी गृहमंत्री म्हणून कोणाचा दबाव होता ?

२. सचिन वाझे आणि पोलिस दलाच्या काही अधिकाऱ्यांवर १०० कोटी वसूल करण्याचा दबाव कोणाचा होता ?

३. मनसुख हिरेन यांची केस दाबण्यासाठी गृहमंत्री म्हणून कोणाचा दबाव होता ?

४. अँटिलिया समोर जी स्फोटकं ठेवली गेली त्या प्रकरणातला नेमका आरोपी कोण आणि यासाठी कोणाचा दबाव होता ?

या चार प्रश्नांची उत्तरं अनिल देशमुख यांनी द्यावी अशी मागणी आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी केली आहे. आता यावर अनिल देशमुख काही बोलणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader