वेदान्त प्रकल्प गुजरातला होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यावरून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक आर्थिक व्यवस्था गुजरातला हलवण्यात आल्या होते. आगामी काळात मुंबई गुजरातला गेल्यास आश्चर्य वाटालया नको, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यावर आता भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तर, अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही शेलार यांनी टीका केली आहे.
“मुंबई गुजरातला देण्याची इच्छा काँग्रेसची होती. मोरारजी देसाई यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत १०६ मराठी माणसांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. मुंबई गुजरातला नेण्यासाठीच तो गोळाबीर करण्यास काँग्रेसने सांगितला होता. त्या काँग्रेससोबत आज शिवसेना बसली आहे. त्यामुळे नाना पटोले, आदित्य ठाकरेंनी १०६ मराठी हुतात्म्यांची हत्या करणाऱ्या आरोपातील सहमतीकार आहेत,” असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
“त्याची गती ही मतिमंदासारखी अजित पवारांच्या…”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा प्रकल्प राज्यासाठी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं आहे. त्यावर वेदान्त आणि मोठाही प्रकल्प आणावा, असं आव्हान विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी दिलं होते. “अजित पवार राज्याचे अर्थमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात किती करसवलती वेदान्त प्रकल्पाला दिल्या. ज्या पद्धतीच्या करसवलीतींची आवश्यकता वेदान्त आणि फॉक्सकॉनला असेल, त्याची गती ही मतिमंदासारखी अजित पवारांच्या कार्यकाळात का होती? जी गती त्यांनी दारू विक्रेते आणि निर्मात्यांना दिली. त्या पद्धतीच्या करसवलतींची गती वेदान्त आणि फॉक्सकॉनला का दिली नाही?,” असा सवाल आशिष शेलार यांनी अजित पवारांना विचारला आहे.
हेही वाचा – “वेदान्त प्रकल्प महाराष्ट्रात…”, आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेवर हल्लाबोल; म्हणाले, “पेंग्विन जावाईशोध…”
“भूलथापा देण्याचा धंडा शिवसेनेने बंद करावा”
वेदान्तमुळे लाखो तरुणांना रोजगार मिळाला असता, असं शिवसेनेकडून म्हटलं जात आहे. त्याचाही आशिष शेलार यांनी समाचार घेतला आहे. “आदित्य ठाकरे कोकणात फिरत आहे. जैतापूर अणुउर्जा आणि नाणारला विरोध का आहे? दीड लाख कोटींच्या प्रकल्पावरून छाती बडवून घेत असून, तीन लाख कोटींच्या प्रकल्पाला विरोध करत आहेत. तिथे मराठी माणसाचं नुकसान होत नाही का? मराठी माणसाला भूलथापा देण्याचा धंदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने बंद करावा,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.