कर्नाटकात काँग्रेस सरकारने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा धडा अभ्यासक्रमातून वगळला आहे. याविरोधात भाजपाने आता आघाडी घेतली आहे. सावरकरांचा अभ्यासक्रम वगळ्यामुळे भाजापने काँग्रेसवर आणि ठाकरे गटावर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही याप्रकरणी काँग्रेसवर टीका केली असून उद्धव ठाकरेंवरही टीकेचे बाण सोडले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक प. पू. डॉ. हेडगेवार यांचे धडे पाठ्यपुस्तकातून वगळण्याच्या कार्नाटक सरकारच्या तुघलकी निर्णयाचा आम्ही निषेध करतो, असं आशिष शेलार म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “अरे, बेक्कल काँग्रेसवाल्यांनो, तुम्ही देशाच्या अशा महान सुपुत्रांचे धडे पाठ्यपुस्तकातून वगळालही पण जनतेच्या मनातून आणि इतिहासाच्या पानातून त्यांचे महान कार्य कधीच वगळू शकणार नाही!” आशिष शेलारांनी ट्वीट करत टीकास्त्र सोडलं आहे.

“महाराष्ट्रातील तथाकथित हिंदुत्ववादी “उबाठा” आता काय वगळणार? काँग्रेस की सावरकर? काँग्रेसच्या असल्या ६० वर्षांच्या कारभाराला कंटाळून जनतेने त्यांना देशातूनच वगळून टाकायचे ठरवलेय! तर काँग्रेसला साथ देणाऱ्या “उबाठा”ला आमदारांनी शिवसेनेतून वगळलेच आता महाराष्ट्रातील जनताही लवकरच उबाठा आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवक्त्यांना धडा शिकवेल!”, असा हल्लाबोलही आशिष शेलारांनी केला आहे.

हेही वाचा >> VIDEO: कर्नाटकात काँग्रेसकडून धर्मांतरविरोधी कायदा रद्द, सावरकरांचा धडाही वगळला, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे…”

कर्नाटकात काँग्रेसने काय निर्णय घेतले

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने मागील भाजपा सरकारचे काही वादग्रस्त निर्णय रद्द कऱण्याचा निर्णय़ गुरुवारी घेतला. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक झाली. त्यामध्ये भाजपाने हिंदुत्त्वाच्या दृष्टीने राबवलेली काही धोरणे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये वादग्रस्त धर्मांतरविरोधी कायद्याचाही समावेश आहे.

तसंच, राज्यातील शाळांमध्ये सहावी ते दहावी या इयत्तांच्या कन्नड आणि समाजशास्त्र या विषयांच्या पाठ्यपुस्तकांची फेरतपासणी करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्यावरील धडे काढून टाकले जाणार आहेत. त्याबरोबरच, सावित्रीबाई फुले, पंडित नेहरुंनी इंदिरा गांधी यांना लिहिलेली पत्रे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील कवितांचा पाठ्यपु्स्तकांमध्ये समावेश केला जाणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनीही केली टीका

“माझा महाविकासआघाडीला सवाल आहे की, ते महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार म्हणत आहेत तो हाच आहे का? आता उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया काय आहे? त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. ते ज्यांच्या मांडिला मांडी लावून बसले ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव पुसायला निघाले आहेत. ते धर्मांतरणाला पाठिंबा देत आहेत,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader ashish shelar criticized on savarkar chapter removed from the chapter in karnataka sgk
Show comments