शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत हे आज जम्मू येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.
“देव, देश आणि धर्माच्या संघर्षातून गायब असलेले खासदार संजय राऊत, काँग्रेसच्या युवराजांसोबत चालायला गेले! याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार गेले, पक्षाची शकले उडाली.. “याच भल्या” कामाचा झेंडा तुम्ही घेऊन निघालाच आहात, तर तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची!” असं आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
नक्की वाचा – ‘POK’चं नंतर बघा अगोदर इथल्या काश्मिरी पंडितांचे जीव वाचवा – संजय राऊतांची मोदी सरकारवर टीका!
याशिवाय, “हिंदुत्वासाठी राम जन्मभूमीचा लढा जेव्हा लाखो कारसेवक लढत होते, तेव्हा संजय राऊत प्रभादेवीच्या गल्लीत बसून होते. 370 कलम मुक्त काश्मीर व्हावे यासाठी असंख्य जण संघर्ष करीत होते, बलिदान देत होते, तेव्हा संजय राऊत मुंबईत बसून मीडियात “ध्वनी प्रदूषण” करीत होते.” असंही आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.
भारतजोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर संजय राऊत काय म्हणाले? –
संजय राऊत म्हणाले, “राहुल गांधींना माझ्याबद्दल चिंता होती. कारण मला अटक का केली हे त्यांना माहिती होतं. कोणत्या कारणासाठी माझा आणि माझ्या कुटुंबाचा छळ सुरू आहे हे त्यांना माहिती होतं. मी वाकत नाही, झुकत नाही. ‘डरो मत’ हा राहुल गांधी आणि माझा सामाईक मंत्र आहे. तेही डरो मत म्हणतात आणि मीही म्हणतो घाबरू नका. हे आमचं मैत्रीचं नातं आहे.”