Ashish Shelar On Amit Thackeray : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी, महायुतीसह सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. या विधानसभेच्या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

माहीम विधानसभा मतदारसंघामधून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर माहीम विधानसभा मतदारसंघामधून शिवसेनेकडून (शिंदे) आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून माहिममध्ये महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता माहिम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, यातच आता भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी केलेल्या एका विधानामुळे ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. “अमित ठाकरे यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहिजे”, असं विधान आशिष शेलार यांनी केलं आहे. त्यामुळे माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुती पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : Congress Candidate 2nd List: मोठी बातमी! काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी?

आशिष शेलार काय म्हणाले?

“अमित ठाकरे यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहिजे, असं मला वाटतं. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी बोलणार आहे. ते यासंदर्भात निर्णय घेतील. यात महायुतीमध्ये कोणताही मतभेद नसला तरी यामुळे एक वेगळ्या पद्धतीचे महाराष्ट्राच्या संस्कृतीला एका अर्थाने जपता येईल असं नातं आपण दाखवलं पाहिजे. सदा सरवणकर यांच्या उमेदवारीला आमचा विरोध नाही. ते महायुतीचे उमेदवार आहेत, महायुती म्हणून निर्णय करावा हे माझं म्हणणं आहे”, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

उदय सामंत काय म्हणाले?

“आशिष शेलार यांची भूमिका ही भारतीय जनता पक्षाची असू शकते. मात्र, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे चर्चा करतील. कारण हा मोठा विषय आहे. राज ठाकरे यांचे चिरंजीव हे निवडणूक लढवत आहेत. त्याबाबत काय करायचं?याचा निर्णय हे महायुतीचे नेते चर्चा करून घेतील. त्याबाबत मी बोलणं योग्य नाही”, अशी प्रतिक्रिया उदय सांमत यांनी दिली आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी अमित ठाकरे यांना समर्थन देण्याच्या पार्श्वभूमीवर सूचक विधान केलं. त्यामुळे आता महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाने आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे सदा सरवणकर यांच्या उमेदवारीचं काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय भूमिका घेतात? याकडे अनेकांचे लक्ष लागलेलं आहे.