शिवतीर्थ म्हणजेच मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. आपल्या भाषणातून त्यांनी या मुद्द्यांवर चौफेर टीका केली. भाजपा हा विघ्नसंतोषी पक्ष आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. अशात आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे.
काय म्हटलं आहे आशिष शेलार यांनी?
परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरात वाटले ते खरे विचारांचे सोने! शिवसैनिकांचा खरा भरगच्च मेळावा आझाद मैदानात महाराष्ट्राने पाहिला !! शिवतीर्थावर पूर्वी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची तोफ धडाडायची !!!
आता.. “काँग्रेसी हृदयसम्राट” बालिशसाहेबांचे आपटीबार फुटतात! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केलात, त्यावरुन तुमची पातळी दिसली. पंतप्रधानांनी भ्रष्टाचार, घराणेशाहीच्या विरोधात दिलेला काढ्याचा असर झालाय हेही सगळ्यांना कळले!! हल्ली मळमळ, उलट्या, अपचन यांचे करपट ढेकरांना हे विचारांचे सोने म्हणतात!! असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे.
भाजपाची परंपरा काय? उद्धव ठाकरे म्हणाले..
“आज जे जमले आहेत तिकडे ते आमच्यावर टीका करतील त्यांना मी किंमत देत नाही. जातीपातीच्या भिंती उभ्या करुन सगळ्यांना आपसांत लढवण्याचं काम जे भाजपा करतं आहे ते आपल्याला मोडून काढायचं आहे. ज्यांच्याशी आपण लढतो आहोत तो (भाजपा) कपटी आहे. भाजपा इतका विघ्नसंतोषी आहे की कुणाचंही लग्न असो हे जाणार पंगतीत बसणार, भरपूर जेवणार, आडवा हात मारणार. श्रीखंड पुरी, बासुंदी, ३५ पुरणपोळ्या खाणार, सगळ्या पुरणपोळ्या फस्त करुन ढेकर देणार. पण लग्नातून निघताना नवरा बायकोत भांडण लावून निघणार असली ही (भाजपा) अवलाद आहे.
स्वातंत्र्य लढ्याचा आणि भाजपाचा संबंध नाही
मी परत एकदा सांगतो भाजपा असो किंवा त्याकाळातला जनसंघ असेल यांचा कुठल्याही लढ्याशी संबंध नव्हता. स्वातंत्र्य लढ्यात ते नव्हते, मराठवाडा मुक्तीसंग्रामात त्यांचं नाव ऐकलं नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही ते नव्हते. पण केव्हा एकत्र आले? संयुक्त महाराष्ट्र समितीत आले. कशासाठी आले? आयतं अन्न शिजतंय चला हात मारु म्हणून आले. सगळ्यात शेवटी हे आले आणि सर्वात आधी बाहेर पडले. जागावाटपाचं भांडण त्यावेळी त्यांनी केलं. विघ्नसंतोषीपण म्हणतात तो यालाच.” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. ज्यावर आता आशिष शेलार यांनी खोचक शब्दांत उत्तर दिलं आहे.