शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच भारतीय जनता पार्टीवर टीका केली होती. “हा राजकीय पक्ष आहे की, चोरबाजार” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी उत्तर दिलं आहे. मुळात उद्धव ठाकरे यांचं सरकार दरोडेखोरांचं सरकार होतं, त्यामुळे त्यांना सगळेच दरोडेखोर आणि चोर वाटायला लागले आहेत, अशी बोचरी टीका भातखळकर यांनी केली आहे. ते विधानसभा परिसरात एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
“भाजपा हा राजकीय पक्ष आहे की, चोरबाजार” या उद्धव ठाकरेंच्या विधानाबाबत विचारलं असता भातखळकर म्हणाले की, “मुळात उद्धव ठाकरे यांचं सरकार दरोडेखोर आणि खंडणीखोरांचं सरकार होतं. ते दरोडेखोर असल्यामुळे त्यांना सगळेच दरोडेखोर आणि चोर वाटायला लागले आहेत. ते म्हणतात की हे नवीन सरकार कंत्राटी पद्धतीचं सरकार आहे, हे कंत्राटी सरकार असलं तरी किमान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एका महिन्यात ७०० जीआर काढले.”
हेही वाचा- “मी इंदिरा गांधींचा फॅन होतो” म्हणत एकनाथ शिंदेंचा पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव
“पण तुम्ही सरकारमध्ये असताना पुढील २५ वर्षे आपणच सत्तेत राहू अशा थाटात वावरत होता. तुम्ही सचिन वाझेंपासून प्रदीप शर्मांपर्यंत सर्वांना पोसलं, खंडण्या गोळा केल्या, याचा सगळा हिशोब शिंदे सरकार तुमच्याकडे मागणार आहे. तुम्हाला त्याचा हिशोब द्यावा लागेल, हे लक्षात ठेवा” असा इशारा अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला ३० जागा जिंकणंही कठीण
“मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीला हाव सुटली आहे” या उद्धव ठाकरेंच्या टीकेसंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता, भातखळकर म्हणाले, “मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीचं घोडंमैदान फार दूर नाही. त्यामुळे निवडणुका होऊ द्या, मग कळेल. गेल्या निवडणुकीत आम्ही एकटे लढलो तर आम्हाला ८२ जागा मिळाल्या. यावेळी तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे. त्यामुळे मी आताच सांगतो, यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाला ३० जागा मिळणंही कठीण आहे.”