युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांनी अलीकडेच शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचा एक फोटो ट्वीटरवर शेअर केला होता. या फोटोमध्ये आदित्य ठाकरेंची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली होती. ‘रयतेचा राजा शिवबा माझा’ असंही संबंधित फोटोवर लिहिण्यात आलं होतं. या फोटोवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर राहुल कनाल यांनी संबंधित फोटो डिलीट केला आहे. तसेच अन्य एक ट्वीट करत माफी मागितली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असं त्यांनी म्हटलं आहे.
या प्रकारानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते अतुल भातखळकर यांनी संताप व्यक्त केला आहे. युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनालविरुद्ध आपण पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राहुल कनाल यांच्या ट्वीटचे स्क्रीनशॉट शेअर करत हा संताप व्यक्त केला आहे.
भातखळकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “आधी बेशरमपणा करायचा आणि नंतर ट्वीट डिलीट करून सारवासारव करायची. आरती ओवाळायची असेल तर आदित्य ठाकरेंचे असे फोटो दिनो मोरया यांच्यासोबत छापा. हिंदुस्तानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना नको. हा चावटपणा करणाऱ्या कनालविरुद्ध मी तक्रार दाखल करणार आहे.”
हेही वाचा- “रामदास कदमांसारखा कृतघ्न माणूस…” दसरा मेळाव्यावरून भास्कर जाधवांची बोचरी टीका
कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता – राहुल कनाल
“कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता. फोटोग्राफरचं कौतुक तर आहेच. पण आदित्यजी ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊनच पुढे जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान आहेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय” असं ट्वीट राहुल कनाल यांनी केलं आहे.
कनाल यांनी अन्य एक ट्वीट करत म्हटलं की, “मी ट्रोल करणाऱ्या लोकांना घाबरत नाही, यापूर्वी मी अनेक ट्रोल्सर्सचा सामना केला आहे. पण मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो. आपली संस्कृती माझ्यासाठी सर्वस्व आहे. माझा हेतू चांगला होता. जर सामान्य नागरिकांना ते आवडलं नसेल तर मी एक जबाबदार नागरिक म्हणून मला कोणालाही दुखवायचं नाही. होय, शिवाजी महाराज आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत.”