सिनेमागृहात ‘हर हर महादेव’ चित्रपट बंद पाडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी सडकून टीका केली आहे. “एखादा चित्रपट तुम्हाला आवडला नाही, तर सिनेमागृहाबाहेर गळ्यात बोर्ड लटकवून उभे राहा आणि चित्रपट पाहू नका असे सांगा. या आवाहनाला ज्यांना प्रतिसाद द्यायचा असेल ते देतील”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. कायदा हातात घेतल्यानंतर जी शिक्षा व्हायची ती होणारच, असेही पाटील यांनी ठासून सांगितले आहेत.
“…आम्ही त्यांना सोडणार नाही” आव्हाडांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, नाव न घेता मनसेला इशारा
“तुम्हाला एखादा विषय आवडला नाही. हा संघर्षाचा विषय आहे का?” असा सवालही पाटील यांनी आव्हाडांना विचारला आहे. सरकार सत्तेतून गेल्याचं सहन होत नसल्याने रोज उठसूठ संघर्ष करण्याचा आव्हाड प्रयत्न करत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला आहे. आव्हाडांवरील कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर त्यांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया, गंभीर आरोप करत म्हणाल्या…
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या विरोधात लढणे, हा आजच्या महाराष्ट्रात गुन्हा झाला आहे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली होती. यावरुनही चंद्रकांत पाटील यांनी टीकास्र डागलं आहे. “तुम्ही म्हणाल तोच इतिहास काय? तुम्हाला पाहिजे ते मांडायला हुकुमशाही आहे का? ही दादागिरी चालणार नाही” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहेत.
‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाशी मोडतोड झाल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता. यावरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे. “संभाजीराजांबद्दल आम्हाला आदर आहे. मात्र, त्यांच्याप्रमाणेच चित्रपट निर्मात्यालाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. या निर्मात्यांकडून इतिहास चुकीचा मांडला जात असल्यास त्यांनी जनप्रबोधन करावं”, असे पाटील यांनी म्हटले आहे.