“आम्ही आयुष्यभर राष्ट्रवादीच्या विरोदात लढलो आणि आता राष्ट्रवादीच्या चिन्हाला पाठिंबा देणार आहोत, म्हणून काही लोक आमच्यावर टीका करतात. पण राजकारणात तराजू लावून निर्णय घ्यायचे असतात. आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त महत्त्वाचा वाटतो”, अशी भावना भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. २०१९ साली शरद पवारांमुळेच आमचे सरकार गेले, असेही ते म्हणाले. जनतेने आमचे १६१ आमदार निवडून दिले होते. पण शरद पवारांनी शिवसेनेला बाजूला करून सरकार स्थापन केले. त्यात आमचे नाही पण जनतेचे खूप नुकसान झाले. त्या ३३ महिन्यात महाराष्ट्राचा काहीही विकास झाला नाही, असाही आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. बारामती येथे पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी शरद पवारांवर टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीतल्या दोन नेत्यांना झुलवत ठेवलं

महाविकास आघाडीच्या ३३ महिन्याच्या काळात महाराष्ट्राचं नुकसान झालं, असे सांगताना चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, “शरद पवार यांनी आम्ही तुमच्याबरोबर सरकार स्थान करतोय करतोय असं सांगून संपूर्ण जग ज्यांना मानतं, त्या माझ्या दोन नेत्यांना झुलवत ठेवलं. आज मला शरद पवारांचा हिशोब चुकता करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे अजित पवारांना बरोबर का घेतलं? असे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे नाहीत. मला फक्त पवारांचा पराभव हवा आहे.”

‘सुप्रिया सुळेंमुळे राष्ट्रवादी आणि आदित्य ठाकरेंमुळे शिवसेनेत फूट’, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

देवेंद्र फडणवीस हे औषध सर्वांना लागू पडतं

बारामती मतदारसंघात सध्या महायुतीच्या नेत्यांमध्येच वाद सुरू आहेत, असाही प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे औषध सर्वांना लागू पडतं. गेल्या दहा वर्षातला फडणवीस यांचा इतिहास काढून बघा. ते या वादावर लगेचच तोडगा काढतील. हर्षवर्धन पाटील असो किंवा कुणीही असो पुढच्या आठवड्यात सर्व लोक बारामतीत एकत्र फिरताना दिसतील.

चंद्रकांत पाटील करणार अजितदादांचा ‘हिशोब’ चुकता

बारामतीत उमेदवार जाहीर करण्याची गरज काय?

बारामतीमध्ये उमेदवार जाहीर करण्याची गरज उरलेली नाही, असेही ते म्हणाले. पण अधिकृत घोषणेसाठी पक्षपातळीवर काही निर्णय होणे अपेक्षित असतात. दोन-तीन दिवसांत संपूर्ण निर्णय होईल. काल आचारसंहिता जाहीर होत असताना जे वेळापत्रक समोर आलं आहे, त्यातून आता उमेदवारी घोषित करण्यासाठी फार घाई करण्याची आवश्यकता नाही, असे लक्षात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बरेचसे टप्पे मे महिन्यात गेले आहेत, त्यामुळे निवांतपणे उमेदवार जाहीर करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader chandrakant patil criticize ncp sharad pawar on 2019 political stand kvg