सांगली: पत्रकारांसाठी निवृत्तीवेतन, घर आणि आरोग्य विमा हे प्रश्न मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन मार्गी लावले जातील, असे सांगलीचे पालकमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या डिजिटल मीडियाच्या राज्य अधिवेशनाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. या अधिवेशनाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. अधिवेशनास खा. विशाल पाटील, आ. गोपीचंद पडळकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे, पत्रकार संघटनेचे राज्य संघटक संजय भोकरे आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे यांनी स्वागत केले.
यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, समाजाचे प्रश्न मांडून न्याय मिळवून देण्याचा माध्यमे प्रयत्न करत असतात. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्यांचा विचारही करायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लागू केलेल्या निवृत्ती वेतन योजनेमुळे पत्रकारांना उत्पन्नाची शाश्वती देण्याचा प्रयत्न होत आहे. पत्रकारांचा विमा राज्य शासनाकडून भरण्यासाठी आपण प्रयत्नशील असून अन्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन निर्णय घेतले जातील.