उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे स्पष्ट वक्तेपणाबद्दल ख्यातकीर्त आहेत. बोलताना कुणाची भीडभाड न ठेवता ऐकणाऱ्याला चांगले वाटावे, किंबहुना बरे वाटावे याची तमा न बाळगता ते बोलत असतात. परवा सांगलीत एका कार्यक्रमात आयोजकांनी आपली रास्त मागणी दादांच्यापुढे मांडली. याला उत्तर देताना दादा निश्चितपणे ठोस आश्वासन देतील अशी अपेक्षा असताना दादा म्हणाले, मी महसूलमंत्री असताना ज्या ज्या प्रकरणी निकाल दिले, त्यापैकी सर्वच प्रकरणे न्यायालयात सिद्ध झाली. यामुळे कोणतीही फाइल सही करण्यापूर्वी मी विचार करूनच सही करतो. अगदी झोपेत असलो तरी सावध असतो. आता दादा झोपेत असतानाही सावध असतात तरीही महसूल खाते आधी विखे-पाटील व नंतर बावनकुळे यांच्या हाती जाताना दादा बहुधा साखरझोपेत होते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वजनदार आमदार खरे ‘खरे’ बोलले?

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला भरभरून यश मिळाल्यानंतर कमकुवत झालेल्या महाविकास आघाडीचा पाया खचू लागला आहे. आघाडीच्या शिल्लक आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे चार आमदार निवडून देऊन पक्षाची इभ्रत राखली असताना आता त्यातील एक आमदार ‘ खरे ‘ बोलू लागला आहे. त्याच्या बोलण्यात खरेपणा किती आणि स्वार्थ किती, याची रंगतदार चर्चा होत आहे. मोहोळ राखीव मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाचे आमदार राजू खरे यांनी आपण खरे शिवसेनेचेच आहोत. विधानसभा निवडणुकीत तुतारी चिन्ह चुकून घेतले होते. आज राज्यात सत्ता आपलीच आहे, असे नुकतेच एका जाहीर कार्यक्रमात बोलून गेले.. खरे आमदार झाल्यानंतर सुरुवातीला त्यांच्या शारीरिक वजनाची चर्चा सुरू होती. त्याचा उल्लेख खुद्द शरद पवार यांनी केला होता. परंतु आता हा ‘वजनदार’ आमदार ‘खरे’ बोलू लागल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात वेगळी कुजबुज ऐकायला मिळते.

घड्याळ, तुतारी एकच !

सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा मेळावा खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर आदींच्या उपस्थितीत पदाधिकारी निवडीसाठी आयोजित करण्यात आला होता. यावेळी पदाधिकारी नियुक्त्यांवेळी जिल्हाभरातून अनेक पदाधिकारी आले होते. यामध्ये एका कार्यकर्त्याच्या मोबाइलच्या मागील बाजूस तुतारीचे चिन्ह चिकटवलेले होते. त्याचा मोबाइल शर्टच्या खिशात असल्याने तुतारीचे चिन्ह स्पष्ट दिसत होते. याची कल्पना त्याला नसावी. त्यावर तुम्ही घड्याळाच्या राष्ट्रवादीचे की त्या तुतारीच्या राष्ट्रवादीचे, असा प्रश्न साहजिकच विचारण्यात आला. घड्याळ काय आणि तुतारी काय. हे एकच आहेत या कार्यकर्त्याच्या उत्तराने सारेच अचंबित झाले.

नवीन जिल्हा कशासाठी?

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या नव्या मंत्र्यांची चलती आहे. त्यांचे जळीस्थळी कौतुक केले जात होते. प्रसिद्धीचा झोत त्यांच्याकडेच वळला आहे. त्याची नाही म्हटले तरी जुन्या मंत्र्यांना बोचणी लागली आहे. कोणाला कमी महत्त्वाचे खाते मिळाल्याबद्दल तर कोणाला मंत्रीपद हुकल्याबद्दल. याची खंत जागा मिळेल तिथे व्यक्त केली जात असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर रविवारी जिल्हा नियोजन मंडळाची पहिली बैठक पार पडली. अवघे प्रशासन, आमदार, खासदार, कार्यकर्ते हे सारेच पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या आगे मागे झुलत होते. प्रकाशझोत त्यांच्या भोवतीच एकवटला होता. यावर माजी राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी टोलेबाजी करीत आता आम्हाला कोणी विचारत नाही, अशी व्यथा मांडली. आमचे महत्त्व वाढायचे असल्यास पूर्वेकडील भागाचा स्वतंत्र जिल्हा झाला पाहिजे. मग मला आणि प्रकाश आवाडे… दोघांनाही महत्त्व येईल. राजकीय महत्त्व येण्यासाठी आता कोल्हापुरात नव्या जिल्ह्याची पेरणी केली जात आहे.

(संकलन : दिगंबर शिंदे, विश्वास पवार, एजाज हुसेन मुजावर, दयानंद लिपारे)