राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपती दर्शनाच्या दौऱ्यावरून टीका केली होती. महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक मुख्यमंत्री मंत्रालयात बसून काम करतील आणि दुसरे मुख्यमंत्री वेगवेगळ्या पद्धतीने फोटोसेशन आणि गणपती दर्शन करतील, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती.
या विधनावरून भाजपा नेते आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “२०१४ ते २०१९ या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अक्षरश: प्रशासन सांभाळून दर आठवड्याला तीन ते चार जिल्ह्यांचा दौरा करायचे. एकनाथ शिंदे यांचा मूळ स्वभाव हा प्रवास करणं, लोकांना भेटणं, लोकांचं ऐकणं असा आहे, त्यामुळे ते दोघे खूप फिरतात.”
हेही वाचा- VIDEO: नवनीत राणाविरोधात पोलीस पत्नी आक्रमक, एकेरी उल्लेख करत दिला इशारा, म्हणाल्या…
“प्रशासनाला काही गडबड आहे का? सगळं व्यवस्थित चाललं आहे. म्हणजे तुमच्या काळातील सर्व प्रलंबित कामं त्यांनी पूर्ण करत आणले आहेत. आता माझंचं उदाहरण घ्या, कोविडमध्ये ज्यांचे आई-वडील वारले, त्या विद्यार्थ्यांची फी माफ करणे, तुकड्या वाढवणं आणि नवीन महाविद्यालये देणं, ही उदाहरणं आहेत. त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशासन सुरू आहे. तुम्ही तर घराच्या बाहेरही पडत नव्हता. सुप्रिया सुळे तुम्ही काळजी करू नका, ते फिरतात पण आणि सरकारही उत्तम चालवतात” असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.
हेही वाचा- “अवघ्या १० मिनिटांत तीन कृषी कायदे मंजूर केले” शरद पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
सध्या राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक मुख्यमंत्री मंत्रालयात बसून काम करू शकतील आणि दुसरे मुख्यमंत्री वेगवेगळ्या पद्धतीने फोटोसेशन आणि गणपती दर्शन करत बसतील. मी स्वतः अनेकदा मुख्यमंत्र्यांना माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या कामांसाठी वेळ मागितला पण ते वेळ देत नाहीत. याचा अर्थ प्रशासन गेल्या अडीच महिन्यापासून ठप्प आहे. हे सरकार ज्या पद्धतीने सांगितलं जाते ओरबडून आणि चुकीच्या पद्धतीने आलेला आहे आणि त्याचा परिणाम प्रशासनावर होताना दिसत आहे. प्रशासनाबरोबर काम करणाऱ्या मंत्र्यांची राज्याला गरज आहे, अशी टीका सुळेंनी केली होती.