मागील काही तासांपासून पुण्यात ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला आहे. यामुळे शहरातील अनेक रस्ते तुडुंब वाहत असून अनेक वाहनं वाहून गेली आहेत. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. अद्याप पुण्यात पावसाचा जोर कायम आहे. पुणे शहरात जलमय स्थिती झाल्याने राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.
दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील स्थितीवरून भाजपा सरकारवर टीकास्र सोडलं आहे. पुण्याला नद्यांचे स्वरूप आले आहे. वाहतुकीबाबत कुणाचे लक्ष नाही. वाहतुककोंडीबाबत पोलिसांना विश्वासात घेण्याची गरज आहे. पुण्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. याकडे लक्ष द्यायला हवे, ते लक्ष दिले जात नाही, असा आरोप अजित पवारांनी केला.
अजित पवारांच्या या आरोपांवर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. गेल्या अडीच वर्षात तुमचं सरकार होतं. पुणे महानगरपालिकेत भाजपाची सत्ता असली तरी पालकमंत्री तुम्ही होता. या कालावधीत तुम्ही कसा काटा लावला होता? कसा हूक लावला होता? याची ही मोठी उदाहरणं आहेत. पालकमंत्री म्हणून तुम्ही महानगरपालिकेला आदेश देऊन खूप गोष्टी करून घ्यायला हव्या होत्या. त्या तुम्ही करून का नाही घेतल्या? तुम्ही बाकीच्याच विषयांमध्ये जास्त रस घेतला, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, “अजित पवार हे मागील अडीच वर्षापासून पुण्याचे पालकमंत्री होते. दरम्यान, त्यांनी महापालिकेला कसं दमवलं? याची खूप मोठी उदाहरणं आहेत. पालकमंत्री म्हणून तुम्ही गटर, नाले साफ करून घ्यायला हवे होते. ते तुम्ही केलं नाही. आता काल तुम्ही पायउतार झाल्यानंतर आज लगेच आरोप करत आहात, असंही पाटील म्हणाले.